काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमात बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांची बदनामी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी वीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुणे न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. आता या खटल्यातून सुटका करून घेण्याचा राहुल गांधी यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून आपल्यावरील जे जे आरोप करण्यात आले आहेत, ते रद्द करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. त्याला याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांनी विरोध केला आहे.
राहुल गांधी यांच्या अर्जात काय म्हटले आहे?
राहुल गांधी यांनी पुणे न्यायालयात जो अर्ज दाखल केला आहे. तो सीआरपीसी २५८ अंतर्गत दाखल केला आहे. या सेक्शनखाली दाखल केलेल्या अर्जाच्या माध्यमातून आरोपी राहुल गांधी यांनी न्यायालयाच्या कामकाजावर शंका उपस्थित केली आहे. या अर्जानुसार आरोपीने त्याच्या विरोधात जे गुन्हे दाखल केले आहेत, ते रद्द करावेत आणि निर्दोष मुक्त करावे किंवा खटला थांबवावा, अशी मागणी केली आहे. या अर्जाच्या माध्यमातून आरोपी राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे या खटल्यातून स्वतःची सुटका करून घेण्याची धडपड सुरु केल्याचे दिसून येत आहे. तसेच याचिकाकर्त्याने त्यांच्या याचिकेत आरोपी राहुल गांधी यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांची बदनामी करून त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीत ऐतिहासिक योगदानाचा अवमान केला असल्याचे म्हटले आहे. त्यावर आरोपीने आता वीर सावरकर यांचे स्वातंत्र्य चळवळीत कसे योगदान नव्हते हे दाखवण्यासाठी ऐतिहासिक पुरावे सादर करायचे असल्याचेही न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात म्हटले आहे.
(हेही वाचा Swargate Bus Depot : पोलिसांपासून वाचण्यासाठी नराधम दत्तात्रय गाडेने काय केले ?)
याचिकाकर्त्यांच्या वकिलांचे काय आहे म्हणणे?
यावर सात्यकी सावरकर यांचे वकील अधिवक्ता संग्राम कोल्हटकर म्हणाले, या खटल्यात आरोपीच्या दोषारोपाचे अजून वाचन झाले नाही. आरोपीने त्याला गुन्हा मान्य आहे की नाही, हे अजून सांगितले नाही. त्याविषयी कुठलेही वक्तव्य केलेले नसताना आरोपी त्याच्यावरील आरोप रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज करूच शकत नाही. न्यायालयाने खटला कसा चालवावा हे आरोपी ठरवू शकत नाही. तसेच आरोपीने ऐतिहासिक पुरावे सादर कारण्याच्याविषयी जो अर्ज केला आहे. तोही निरर्थक आहे. कारण आरोपी असे पुरावे कधीच सादर करू शकणार नाही. हा केवळ वेळकाढूपणा आहे, असे अधिवक्ता संग्राम कोल्हटकर म्हणाले. असाच अर्ज आरोपी राहुल गांधी यांनी भिवंडी न्यायालयातही केला होता, त्या अर्जाच्या माध्यमातून त्यांनी दोन वर्षे वेळ काढूपणा केला. तोच अर्ज आता आरोपी राहुल गांधी यांनी पुण्यातील न्यायालयातही केला आहे. वास्तविक हा खटला अजून सुरूच झाला नाही. आम्हालाच आमचे पुरावे सादर करणे अजून शक्य झाले नाही, तिथे राहुल गांधी कुठून ऐतिहासिक पुरावे सादर करणार आहेत. उलट याचिकाकर्ते सात्यकी सावरकर यांचीच या खटल्याच्या माध्यमातून वीर सावरकर यांच्याविषयीचे ऐतिहासिक पुरावे जनसामान्यांसमोर यावेत, अशी इच्छा व्यक्त आहे, असे सांगत आम्ही न्यायालयात दिलेल्या अर्जात हा खटला कोणताही विलंब न करता त्वरित पुढे न्यावा, अशी मागणी केल्याचे अधिवक्ता संग्राम कोल्हटकर म्हणाले. (Veer Savarkar)
Join Our WhatsApp Community