महराष्ट्राच्या अध्यक्षस्थानी राहुल नार्वेकर यांची निवड झाली. त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात अक्षरशः फटकेबाजी केली. यावेळी मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर मार्मिक टीका केली.
२३ नोव्हेंबरची करून दिली आठवण
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांना कोपरखळी मारली. अजितदादा, तुम्ही म्हणालात की, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या कानात सांगितले असते, तुम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली असती. ते आता शक्य नाही, त्यांची चूक झाली. पण मी तुम्हाला सांगतो की, तुम्हाला आयुष्यात असे जर कधी वाटले तर आमच्या कानात मात्र निश्चित सांगा. तुम्ही या अगोदर सांगितले होते, आठवा २३ नोव्हेंबर तारीख, ते जमले नाही आणि जयंत पाटील यांच्या कानात कधीच सांगू नका. त्यांच्यात कानात सांगणे धोक्याचे आहे, असे मुनगंटीवार म्हणताच सभागृहात हश्या पिकला.
(हेही वाचा अबू आझमींना नव्या अध्यक्षांची तंबी! )
अजित पवार काय म्हणाले होते?
आता हे नवे सरकार कसे आले काय आले यात मी जात नाही. पण एकनाथराव तुम्ही मला जरी एकदा कानात सांगितले असते की उद्धव ठाकरेंशी बोला आणि अडीच वर्ष झालीत मला मुख्यमंत्री करा तर मी नक्कीच त्यांच्याशी बोललो असतो. आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता, असे अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवार यांनी विधानभवनात उपस्थित असेलल्या आदित्य ठाकरेंकडेही याची विचारणा केली. काय आदित्य आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता ना?, असे अजित पवार म्हणाले. अजित पवारांच्या या वाक्याने सर्वत्र हशा पिकला.
आदित्य ठाकरे गुरुदक्षिणेतून उरलेले सदस्य देतील
नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्यावर आदित्य ठाकरे यांनी माझ्या कानात सांगितले की, ‘तुम्ही त्यांना शिकवले.’ खरे तर नार्वेकर यांनीही आदित्य ठाकरे यांना शिकवले आहे. त्यामुळे ते त्यांच्या गुरुस्थानी आहेत. त्यामुळे या सभागृहाचे काम उत्तमप्रकारे चालावे म्हणून आदित्य ठाकरे गुरुदक्षिणा म्हणून देतीलच आणि यापुढे जाऊन आणखी गुरुदक्षिणा म्हणून उरलेले शिवसेनेचे सदस्यही देतील, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरे यांना चिमटा काढला.
(हेही वाचा काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेलाही ‘प्रिंटिंग मिस्टेक’ची लागण)
Join Our WhatsApp Community