विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी, २५ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही भेट राजकीय नसल्याचे नार्वेकर यांनी म्हटले असले तरी सध्या राज्याचे लक्ष लागलेल्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता नार्वेकर घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर आणि अमित शहा यांच्यात झालेल्या भेटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. पण राहुल नार्वेकर यांनी मार्सेलिस येथे उभारण्यात येणाऱ्या वीर सावरकर स्मारकासंदर्भात अमित शहांची भेट घेतल्याचे समोर आले आहे.
राहुल नार्वेकर काय म्हणाले?
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक फ्रान्सच्या मार्सेलिस किनारपट्टीवर उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या कामासंदर्भात माहिती देण्यासाठी आपण अमित शहांची भेट घेतल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले. अमित शहा या कामाबाबत सकारात्मक असल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.
(हेही वाचा – मार्सेलिस येथे वीर सावरकर यांचे स्मारक भारतीयांसाठी अभिमानास्पद!)
राहुल नार्वेकर यांनी अमित शहांसोबतच देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची देखील भेट घेतली आहे. या दोन्ही भेटींमुळे राजकीय गोटात वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यासंदर्भात खलबते होत असल्याचेही बोलले जात आहे. आता लवकरच अपात्रतेसंदर्भात निकाल लागेल अशाही चर्चा रंगल्या आहेत.
(हेही वाचा – शिंदे, फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर; वरिष्ठ नेत्यांना भेटणार)
राहुल नार्वेकर दिल्लीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माझ्या मतदार संघातील काही कामे होती. या अनुषंगाने मी दिल्ली दौऱ्यावर आलो आहे. दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांची भेट घेतली का? असा प्रश्न विचारला असता अनेक लोकांना भेटत असतो. अद्याप राजकीय दृष्टिकोनातून भेट झालेली नाही. अनेकदा दिल्लीत येत असतो. परंतु, सत्तासंघर्षाच्या निकालानंतर पहिल्यांदाच दिल्लीत आलो असल्याचे नार्वेकर म्हणाले.
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचे विधानसभा अध्यक्ष म्हणून निमंत्रण मिळाले आहे का? असा सवाल विचारला असता या संबंधी विधीमंडळ सचिवालाकडे माहिती मिळेल. अद्याप यासंदर्भात माझ्याकडे माहिती नसल्याचे नार्वेकर म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community