महापालिका अभियंत्यांच्या संरक्षणासाठी कायदा करा, अशी मागणी मुंबई महानगरपालिका इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष खासदार राहुल शेवाळे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केलेल्या कायद्याच्या धर्तीवर, अभियंत्यांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सक्षम कायदा करावा, असे शेवाळे यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा : 18 सप्टेंबरपासून मुंबईत पोलिओ लसीकरण मोहीम )
राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने, मुंबई महानगरपालिका इंजिनीअर्स असोसिएशनच्या पुढाकाराने गुरुवारी सायंकाळी प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष राहुल व खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे ही मागणी केली. मुंबई महानगरपालिका इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष खासदार राहुल शेवाळे यांच्या विनंतीनुसार पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी असोसिएशनच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद स्वीकारले.
या कार्यक्रमात खासदार शेवाळे आणि कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी महापालिका अभियंत्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्याची विनंती केली. पालिका अभियंत्यांची वेतनश्रेणी राज्य सरकारच्या अभियंता पदानुसर करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, सहाय्यक आयुक्त पदाकरीता अभियंत्यांना पन्नास टक्के आरक्षण द्यावे, पदोन्नतीच्या जाचक अर्हता रद्द कराव्यात यांसह अन्य मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना दिले.
तसेच पायाभूत प्रकल्प उभारणीत पालिका अभियंत्यांच्या योगदानाचा गौरवही मुख्यमंत्र्यांनी केला. मुंबईला पुढे नेण्यासाठी अभियंत्यांनी उत्कृष्ट दर्जाचे काम करावे, अशी अपेक्षाही यावेळी त्यांनी व्यक्त केली.मुंबई महानगरपालिका अभियंत्यांच्या वेतनश्रेणी आणि पदोन्नती बाबतच्या प्रलंबित मागण्या लवकरच पूर्ण कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पालिका अभियंत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलारसू, कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष, यशवंत धुरी, नवनाथ घाटगे,तसेच विनोद चिठोरे, अतुल पाटील, चक्रधर कांडरकर सुनील राठोड, सतीश गीते,संजय कामत वरिष्ठ अभियंते यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Join Our WhatsApp Community