दिशा सालियनचा संशयास्पद मृत्यू, उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी आदित्य आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट केल्याने उद्धवसेना आक्रमक झाली आहे. भाजपा आणि शिंदे गटाने केलेले हे आरोप खोडून काढण्यासह सत्ताधाऱ्यांची काही प्रकरणे बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरेंची फौज नागपुरात दाखल झाली आहे. सोमवारी नागपूर विधानभवनात ‘बॉम्ब’ फोडणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते कोणता बॉम्ब फोडणार, याची माहिती हिंदुस्थान पोस्टच्या हाती लागली आहे.
राहुल शेवाळे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन, ‘माझे राजकीय आयुष्य संपवण्यासाठी उद्धव गटाकडून महिलेचा वापर केला जात आहे’, असा आरोप केला होता. यात त्यांनी थेट आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले. त्यामुळे उद्धव सेना आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले होते. त्यामुळे या प्रकरणातील काही गुप्त माहिती त्यांच्याकडे आहे. ती आता उघड केली जाण्याची शक्यता आहे.
शिवाय ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणासंदर्भात काही माहिती ठाकरे गटाकडे आहे. परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली होती, त्यात काही सांकेतिक नावे नमूद होती. त्यात शिंदे गटातील काही बड्या व्यक्तींचा समावेश असल्याचे कळते. ती नावे जाहीर केली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी हिंदुस्थान पोस्टला सांगितले.
उद्धव सेनेची फौज नागपुरात
सत्ताधाऱ्यांकडून सुरू असलेल्या बेछूट आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी उद्धव सेनेची फौज नागपुरात दाखल झाली आहे. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर रविवारी रात्री नागपुरात पोहोचले आहेत. त्यामुळे अधिवेशनाचा दुसरा आठवडा प्रचंड वादळी ठरण्याची शक्यता आहे.