राहुल शेवाळेंनी सांगितला ‘भारत’ आणि ‘इंडिया’चा अर्थ; म्हणाले, I.N.D.I.A. शब्दात पारतंत्र्याचा वास 

187

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम हा देश हिंदू राष्ट्र आहे, म्हणून वेगळे हिंदू राष्ट्र बनवण्याची गरज नाही, असे म्हणत असत. त्यामुळे आम्ही गर्वाने हिंदुस्थान म्हणतो. इंडिया आणि हिंदुस्थान या दोन वेगळ्या विचारधारा आहेत. इंडिया हे नाव युरोपातील आक्रमणकर्त्यांकडून देण्यात आले आहे. जे भारत या नावाचा अर्थ जाणत नाहीत. इंडिया नावात पारतंत्र्याचा वास आहे. त्यांची आणि आमची संस्कृती वेगळी आहे. आमची संस्कृती ही या मातीचे रक्षण करणारी आहे. म्हणून माझे कर्तव्य म्हणून आम्ही भारताचे रक्षक पंतप्रधान मोदी यांच्या बाजूने उभे राहत आहोत, असे शिवसेनेचे नेते, खासदार शेवाळे लोकसभेत म्हणाले.

मणिपूर प्रकरणी विरोधकांनी मोदी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला आहे. त्यावरील चर्चेत सहभागी होताना खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रस्तावाला विरोध केला. मणिपूरमध्ये आग लागली आहे, पण ती विझवण्याचे काम कुणी करत नाही. विरोधी पक्ष ती आग वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत मणिपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाय केले जात आहेत, याचा आढावा दिला. महाराष्ट्रातूनही तिथे सर्व मदत पाठवली जात आहे. मुख्यमंत्री शिंदे याकडे लक्ष ठेवून आहेत, असेही खासदार शेवाळे म्हणाले.

(हेही वाचा No-Confidence Motion : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार)

भारत म्हणजे अंध:कारातून प्रकाशाकडे जाणे 

विरोधी पक्षांनी जी आघाडी बनवली आहे त्यांच्या नावात इंडिया आहे, पण त्यात सहा डॉट आहेत. खरंतर आज विश्वात तुम्ही कुठेही गेलात तर तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले जाते. आपल्या देशाचे नाव भारत आहे, हा संस्कृत शब्द आहे. या शब्दातील ‘भ’ अक्षर म्हणजे प्रकाश. भारत या शब्दाचा अर्थ आहे प्रकाशात विलीन होणे. अंधःकाराकडून प्रकाशाच्या दिशेने जाणे, हीच भारतीय संस्कृती आहे. पंतप्रधान मोदी हे देशाला अंध:कारातून प्रकाशाकडे नेत आहेत. हाच भारत आहे. या भारताला विरोध करण्यासाठी एकत्र आलेला विरोधी पक्ष म्हणजे तांबे, पितळ यांचे विध्वसंक संघटन आहे. जे देशाला अंधाराच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत. म्हणून मी या प्रस्तावाला विरोध करत आहे. म्हणून मी स्वतःला भारतीय म्हणतो. भारत या शब्दाच्या उत्पत्तीचा इतिहास आहे. शंकुतला आणि दृश्यंत यांचा पुत्र राजा भरत यांची कथा महाभारतात आहे. भगवान श्रीराम यांचे पुत्र राजा भरत यांचा परिचय रामायणात होतो. ज्यांनी केवळ बंधू प्रेमाच्या पोटी राज्याचा त्याग केला होता. भरतमुनी ज्यांनी नाट्यशास्त्र लिहिले. हे तीन भरत क्रमशः सत्य, शिव आणि सुंदरता यांना प्रेरीत करतात. मी त्या भारताचे समर्थन करताना मोदी सरकारला विरोध करणाऱ्या अविश्वास प्रस्तावाला विरोध करतो, असेही खासदार राहुल शेवाळे म्हणाले. शेतकरी नेते शरद जोशी यांनीही म्हटले होते की एक आहे भारत आणि दुसरा इंडिया. भारत हा शेती उत्पादकांचा देश आहे आणि इंडिया हा शेतकऱ्यांचे शोषण करून जगणारा आहे. स्वतःला इंडिया म्हणून संबोधित करणाऱ्यांनी मान्य केले आहे की ते शोषकांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आम्ही भारतीय देशाचे शेतकरी आणि मजुरांचे प्रतिनिधीत्व करतो, असेही खासदार शेवाळे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.