केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झालेले नारायण राणे जोरदार कामाला लागले आहेत. मंत्री होताच त्यांनी कोकणाच्या विकासाकडे लक्ष दिले आहे. त्यामुळे राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. कोकणवासियांना फायदेशीर ठरू शकतील, असे तीन प्रस्ताव अश्विनी वैष्णव यांच्यासमोर राणे यांनी मांडले आहेत.
या केल्या प्रमुख तीन मागण्या
रेल्वेमंत्र्यांना भेटून राणेंनी विविध तीन मागण्या केल्या असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जादा ट्रेन सोडण्यात याव्यात. तसेच कोकण रेल्वेमार्गावर ट्रॅकलगत नारळाची झाडे लावण्यासाठी जमीन द्यावी आणि कुडाळ तालुक्यात टू लेन रोडला परवानगी मिळावी, अशी मागणी राणेंनी केली आहे. नारायण राणे यांच्याकडे सध्या लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला होता. आपल्या या केंद्रीय मंत्री पदाचा नारायण राणे राज्याला आणि विशेषत: कोकणाला कसा उपयोग करून घेता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत.
(हेही वाचा : महाराष्ट्राला वाढला तिसऱ्या लाटेचा धोका! डेल्टा प्लस पसरतोय!)
अशी आहे राणेंची जन आशीर्वाद यात्रा
दरम्यान नारायण राणे हे १९ ऑगस्टपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रा सुरु करणार आहेत. १९ आणि २० ऑगस्ट असे दोन दिवस ही यात्रा मुंबईत नियोजित आहे. त्यानंतर २१ ऑगस्टला वसई-विरार, मग २३ ऑगस्टला दक्षिण रायगड, २४ ऑगस्टला चिपळूणमध्ये जाणार आहे. २५ ऑगस्ट रत्नागिरी आणि २६ ऑगस्टला सिंधुदुर्ग येथे नारायण राणेंच्या या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप होणार आहे. मंत्री झाल्यानंतर नारायण राणे पहिल्यांदाच थेट जनतेपर्यंत जाणार आहेत. केंद्र सरकारने जे चांगले निर्णय घेतले आहेत ते कसे जनतेपर्यंत घेऊन जायचे याची एक रूपरेषा करत आहोत, याची माहिती जनतेला देणार आहे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community