रेल्वेचे कोणत्याही स्थितीत खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली. पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजनेतील लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे आणि लाभाचे वितरण करण्याच्या कार्यक्रमासाठी दानवे रत्नागिरीत आले होते. त्यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषद घेतली, तेव्हा ते बोलत होते.
कोरोना काळात बंद केलेल्या सवलती सुरु करणार
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना ते म्हणाले, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणार नाही. रेल्वेला प्रवासी वाहतुकीपेक्षाही मालवाहतकीतून मोठा फायदा होत असतो. त्यामुळे रत्नागिरीतील पुरेसा माल उपलब्ध होणार असेल, तर रो-रो सेवा तसेच मालवाहतुकीसाठी व्यवस्था रत्नागिरी स्थानकात केली जाईल. सध्या रत्नागिरी दिवा मार्गावर धावणारी पॅसेंजर पूर्वीप्रमाणेच दादरपर्यंत नेण्याचा विचार केला जाईल. कोरोनाच्या काळात बंद केलेल्या विविध सवलती टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जातील, असेही ते म्हणाले.
( हेही वाचा: स्कूल बसमध्ये जीपीआरएस बसवणे बंधनकारक )
केंद्रावर टीका करण्याचे काही कारण नाही
राज्यातील महाविकास आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरल्याचा, आरोप करून दानवे म्हणाले, सरकारला ज्या बाबतीत अपयश येते, त्याचा दोष केंद्र सरकारला दिला जातो. जीएसटीचा परतावा केंद्र सरकारकडून दिला नसल्याचा कांगावा करणारे राज्य सरकार मुंबई-अहमदाबाद रेल्वेसारख्या अनेक योजनांचा राज्य सरकारचा वाटा केंद्र सरकारला देत नाही. कोकण रेल्वेत राज्य शासनाचा २२ टक्के वाटा आहे. तरीही कोकण रेल्वेच्या विकासासाठी राज्य सरकार निधी देत नाही. जीएसटीचा परतावा त्या त्या राज्य सरकारला योग्य त्या प्रमाणात दिला जातो. त्यामध्ये टीका करण्यासारखे काहीही नाही, असेही दानवे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community