महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या उपाययोजना करुन हे अधिवेशन घेण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने विधानसभा आणि विधान परिषद यांच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
सर्व सदस्यांची होणार तपासणी
या बैठकीमध्ये कोविड परिस्थितीत सुरक्षाविषयक मापदंडांचे पालन करुन अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 6 सप्टेंबर रोजी सर्व सदस्यांची कोविड-१९ साठीची ‘आरटीपीसीआर’ तपासणी करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोविड चाचणी निगेटिव्ह असलेल्या सदस्यांनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल असा देखील निर्णय घेण्यात आला आहे.
अशी असेल आसनव्यवस्था
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी सदस्यांची बसण्याची व्यवस्था आवश्यकतेप्रमाणे सभागृहाच्या प्रेक्षक आणि विद्यार्थी गॅलरीमध्येही करण्यात येणार आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून प्रत्येक सदस्याला सुरक्षा किट देण्यात येणार आहे. या किटमध्ये फेस शील्ड, मास्क, हॅण्ड ग्लोव्हज, सॅनिटायझर आदी वस्तूंचा समावेश असेल.
स्वीय सहाय्यकांना प्रवेश नाही
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सदस्यांच्या स्वीय सहायकांना विधानमंडळात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, स्वीय सहायकांची आणि सदस्यांच्या वाहनचालकांची बसण्याची तसेच अल्पोपहार आदी व्यवस्था विधानमंडळ परिसरात तंबू (टेन्ट) टाकून करण्यात येईल. तसेच सहव्याधी असलेल्या (कोमॉर्बिडीटी) सदस्यांना काळजी घेण्याबाबतच्या सूचना संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून दिली जावी.
असे असेल अधिवेशन
या अधिवेशनात शोक प्रस्तावावर चर्चा, अतारांकित प्रश्न, पुरवणी मागण्या, विनियोजन विधेयक यावर चर्चा घेण्यात येतील. यामध्ये 7 शासकीय विधेयके आणि एक विनियोजन विधेयकाचा समावेश असेल, अशी माहिती विधानमंडळ सचिव ॲड. राजेंद्र भागवत यांनी यावेळी दिली.
Join Our WhatsApp Community