माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकारांच्या लिखाणाचा संबंध काय? पवारांना राज ठाकरेंचा सवाल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज ठाकरेंनी प्रबाधनकार ठाकरेंचे लिखाण वाचण्याची गरज आहे, असा सल्ला त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्याला आता राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत प्रत्त्युत्तर दिले आहे. माझ्या विधानाचा आणि प्रबोधनकारांच्या लिखाणाचा काय संबंध आहे हे मला शरद पवारांनी सांगावे, अशा शब्दांत त्यांनी पवारांना प्रश्न विचारला आहे.

काय म्हणाला राज ठाकरे?

मी प्रबोधनकार वाचले आहेत आणि यशवंतरावही वाचले आहेत. मी जे बोललो त्याचा आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाचा काय संबंध आहे, ते मला शरद पवारांनी सांगावे. अजूनही आपण जातीपातीच्या राजकारणात अडकले आहोत. हे आपल्या देशात 74 वर्षांपासून चालू आहे. 99च्या अगोदरही महाराष्ट्रात जातीपाती होत्या पण जातीबद्दलचा द्वेष राज्यात राष्ट्रवादीच्या जन्मानंतर झाला हे विधान मी केले होते, असे राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचाः राज ठाकरेंनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे… पवारांचा सल्ला)

भूमिका बदलण्याचा संबंध काय?

नरेंद्र मोदी हे विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान झाले, जातीपातीच्या आधारावर नाही. त्यामुळे विकासाच्या आधारे सुद्धा निवडणुका जिंकता येतात. पण सध्या जातीचं वातावरण तयार केलं जात आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. मी जेव्हा शरद पवारांची मुलाखत घेतली होती, त्यावेळी मी माझी भूमिका बदलली असल्याचे विचारण्यात आले. पण त्याचा काहीच संबंध नाही. मी जेव्हा त्यांच्या वाढदिवशी भाषण केलं होतं, तेव्हा आजच्या दिवशी काही गोष्टी या राखूनच ठेवायला हव्यात, असे भाषणाच्या सुरुवातीलाच सांगितले होते. मग मी काय भूमिका बदलली, असाही सवाल राज ठाकरे यांनी केला. झेंडा बदलून भूमिका बदलत नाही, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले होते पवार?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाला, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर, राज ठाकरे यांच्या या टीकेला खुद्द शरद पवार यांनी उत्तर दिले होते. राज ठाकरे यांनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार यांचे लिखाण वाचावे, असे शरद पवार म्हणाले होते. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्याबद्दल जास्त न बोललेलेच बरे, असेही पवार म्हणाले होते.

(हेही वाचाः आधी स्वतःचं मन शुद्ध करा… राणेंचे शिवसेनेला चोख उत्तर)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here