सुळे, पाटील, भुजबळ, पवार; राष्ट्रवादीच्या नेत्यांवर राज ठाकरेंचा ‘वार’

133

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्यातील उत्तर सभेत टीका करणा-यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गुढीपाडव्याच्या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती, त्यांच्यावर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

यावेळी लाव रे तो व्हिडिओचा दुसरा भागही महाराष्ट्राला पहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांच्यावर राज ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

(हेही वाचाः “फक्त अजित पवारांच्याच घरी छापा का, एकेक आत जाण्यातही पवारांचा हात नाही ना?”)

खायचे दात वेगळे आणि दाखवायचे ‘सुळे’ वेगळे

लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे एका नोटीसीमुळे इतके बदलतील असं वाटलं नव्हतं, अशी टीका करणा-या सुप्रिया सुळे यांना राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे यांनी मला बोलू नये, त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत. एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी धाड पडते पण तुमच्या घरी का नाही? याचं कारण मला कळेल का, असा थेट सवाल त्यांनी यावेळी केला. कारण महाराष्ट्रातील एखादा नेता आत गेला की शरद पवार मोदींची भेट घेतात. पवार खूश झाले की भीती वाटायला लागते. अजित पवार आणि त्यांच्या सख्ख्या बहिणींच्या घरी धाड पडते तरी शरद पवार आणि मोदींचे संबंध चांगले कसे राहतात, असा सवालही त्यांनी केला आहे.

जयंत पाटील म्हणजे ‘चकीत चंदू’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा उल्लेख राज ठाकरे यांनी जंत पाटील असा करत, त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. उत्तर प्रदेशातला विकास पहायला राज ठाकरे कधी गेले होते, अशी टीका पाटील यांनी केली होती. त्यावर राज ठाकरे यांनी हल्ला चढवला आहे. जयंत पाटील यांनी माझे भाषण नीट ऐकावे. ज्या बातम्या कानावर येतात तसा विकास जर उत्तर प्रदेशात झाला असेल, तर मला आनंद आहे, असं मी म्हणालो होतो. काही विचारलं की ते चकीत चंदूप्रमाणे बोलतात. त्यांना त्यांच्या मतदारसंघाबाहेर कोणी विचारत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. मनसे हा विझलेला पक्ष आहे अशी टीका पाटलांनी केली होती पण हा विझलेला नाही विझवत जाणारा पक्ष आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

(हेही वाचाः ‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम)

भुजबळ… म्हणून तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं

मी सुद्धा मोदी आणि भाजप विरोधात बोलत होतो, त्यामुळे मी त्रास सहन केला पण मी माझा मार्ग बदलला नाही. तुमच्या सीएने केलेल्या केसेसमुळे तुम्हाला आत जावं लागलं. तुमच्या संस्थेतील गैरव्यवहारांमुळे तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं, मोदींवरील टीकेमुळे नाही, असं प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी भुजबळ यांना दिलं.

पवारांनी आवाज काढल्यानंतर अजित पवारांना ऐकू येत नव्हतं

भोंगे आताच दिसले का, याच्या आधी काय झोपा काढत होतात का?, अशी टीका अजित पवार यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी त्यांच्या जुन्या भाषणांतील व्हिडिओ लावत सोक्षमोक्ष लावला. मी कधी-कधी काय बोललो ते मला माहीत आहे. तुमच्या माहितीसाठी मी तीन व्हिडिओ आणले आहेत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो, असं म्हणत त्यांनी भोंग्यांविरोधी घेतलेली आपली भूमिका स्पष्ट केली. सकाळच्या शपथविधीनंतर शरद पवारांनी जो आवाज काढला त्यानंतर तीन-चार महिने अजित पवारांना काही ऐकू येत नव्हतं. लॉकडाऊनच्या काळात कान साफ झाले असतील, त्यामुळे गुढीपाडव्याचा भोंगा ऐकू आला. या भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे, तिथे धार्मिक गोष्टी कुठे आल्या, असा सवालही त्यांनी केला.

(हेही वाचाः राज ठाकरेंनी मोदींकडे केल्या ‘या’ दोन मागण्या)

वस्तरा मिळेल कसा, दाढी कुठे करतात?

राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे मशिदींमध्ये वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्याला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की वस्तरा सापडेल कसा, दाढी कुठे करतात. तुम्हाला केवळ वस्तरा दिसला?, मला तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, अशी बोचरी टीका राज ठाकरेंनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.