Raj Thackeray : राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख होतील का?

278
Raj Thackeray : राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख होतील का?
Raj Thackeray : राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख होतील का?
जयेश शत्रुघ्न मेस्त्री

राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित ठाकरे (Amit Thackeray) हे अमित शाह यांना भेटायला दिल्लीत गेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सुरु झाली. मनसे महायुतीत प्रवेश करणार इथपासून राज ठाकरे शिवसेनाप्रमुख होतील इथपर्यंत अनेक अंदाज बांधले गेले. त्यात न्यूज मीडियाच्या विश्वसनीय सूत्रांनी राज ठाकरेंनी मनसे शिवसेनेत विलीन करावी असा प्रस्ताव अमित शाह (Amit Shah) यांनी ठाकरे यांच्यासमोर ठेवला असल्याचा कांगावा करायला सुरुवात केली. राजकारणात काहीही अशक्य नसतं हे जरी खरं असलं तरी ’फायदा’, ’लाभ’ याशिवाय कोणतेही डावपेच आखले जात नाहीत.

मतदाराला आपल्याकडे वळवण्यात ठाकरे अपयशी

राज ठाकरे यांनी २००५ मध्ये शिवसेना सोडली आणि २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) या पक्षाची स्थापना केली. सुरुवातीला मनसेला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र या पक्षाला मराठीच्या मुद्द्यावर फारसे यश न मिळाल्यामुळे आता पक्षाने हिंदुत्व हाती घेतलं आहे. माझ्यासारखे अनेक मराठी तरुण सुरुवातीच्या काळात राज ठाकरे यांच्यासोबत गेले असले तरी १० वर्षांतच तरुणांचा भ्रमनिरास झाला आणि पक्षाला मिळत असलेला पाठिंबा कमी कमी होत गेला. राज ठाकरे हे सभा गाजवणारे नेते आहेत, कधीही कोणत्याही वेळी ते ट्रेंडिंग होऊ शकतात, ही क्षमता जरी त्यांच्यात असली तरी मतदाराला आपल्याकडे वळवण्यात ते अपयशी ठरले आहेत. हिंदुत्व स्वीकारायच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीसाठी प्रचार केला होता. ’लाव रे तो व्हिडिओ’ हा ठाकरेंचा डायलॉग खूप गाजला. मात्र ठाकरेंनी मोदींचा कितीही अपप्रचार केला तरी जनतेच्या मनावर कोणताच परिणाम झाला नाही आणि मोदी पुन्हा बहुमताने निवडून आले. इतकंच काय तर मोदींवर टीका केली म्हणून शिवाजी पार्कातही त्यांच्या स्थानिक जनतेने नाराजी व्यक्त केली.

शिंदेंना दुय्यम पद मिळणार?

थोडक्यात काय तर मनसेचा प्रभाव महाराष्ट्रावर राहिला नाही. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की अमित शाह यांनी ठाकरेंसोबत गुप्त बैठक का घेतली? अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे की राज ठाकरेंना शिवसेनाप्रमुख पद देण्यासाठी भाजपा आग्रही आहे. पण यात भाजपाचा काय फायदा? आणि मग एकनाथ शिंदेंचं काय करायचं? कारण राज ठाकरे (Raj Thackeray) शिवसेनेत आले तर ते सर्वोच्च पद घेणार आणि शिंदेंना दुय्यम पद मिळणार. दुसरी गोष्ट ठाकरे आले तर पुन्हा कुटुंबवाद येणार. त्यांच्यानंतर त्यांचे वारसदार शिवनेसा अध्यक्ष होणार, जे भाजपाला नकोय. आघाडी सरकार पाडून, शिवसेनेत बंड करुन एकनाथ शिंदेंनी आयुष्यातली मोठी जोखीम उचलली आहे. मग मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्याला दुय्यम स्थान आणि कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्याला सर्वोच्च स्थान देण्यात कोणतं आलंय शहाणपण? म्हणून राज ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख व्हावं हा मुद्दा गौण आहे. मग राज ठाकरेंना तातडीने का बोलावलं?

ठाकरे विरुद्ध ठाकरे असे वातावरण निर्माण करणे 

अबकी बार ४०० पार, यामध्ये शाह यांना कोणताही अडथळा नकोय. भाजपाला महाराष्ट्रातली पवार लॉबी संपुष्टात आणायची आहे आणि उद्धव ठाकरेंना राजकारणातून संन्यास घ्यायला लावायचा आहे. ठाकरे विरुद्ध ठाकरे असे वातावरण निर्माण करुन हे शक्य आहे. लोकसभेमध्ये जर राज यांच्याकडून लाभ मिळाला तर पुढे विधानसभा आणि पालिकेच्या निवडणुकीत मनसेला जागा देण्याबाबत विचार करता येईल. राज ठाकरेंची ताकद फारशी वाढू न देता त्यांना आपल्या बाजूने ठेवणे यात भाजपाचा अधिक फायदा आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे महत्वाचे राज्य आहे. या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत जर पवार लॉबीला मात दिली, उद्धव ठाकरे पूर्णपणे शक्तिहीन झाले तर महाराष्ट्रावर परिपूर्ण सत्ता स्थापन करण्याची भाजपाची इच्छा पूर्ण होईल. आणि छत्रपती व सावरकरांचा महाराष्ट्र त्यांच्या तत्वांनी चालणा-या पक्षाच्या हातात जायला हवा. (Raj Thackeray)

हेही पहा 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.