राज ठाकरे म्हणतायत, ‘लोक मला फुकट घालवत आहेत!’

128

राजकारणी समाज बिघडवतात की समाज राजकारण्यांना बिघडवतो, हा प्रश्न आहे. १९९८ ची लोकसभा निवडणूक चक्क कांद्याच्या मुद्द्यावर लढवली गेली होती. नाशिकमध्ये आम्ही इतकी कामे केली. आजही लोक आठवण काढतात. नाशिकचा आम्ही ५० वर्षांचा पाण्याचा प्रश्न सोडवला. इतके सर्व करूनही निवडणुकीत लोक तुमच्या कामावर मतदान करत नसतील, तर कामे तरी का करायची, असा विचार येतो. हे जनतेने थांबवायचे आहे. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ या भूमिकेत जोवर लोक येत नाही तोवर राजकारणी सुधारणार नाही. कामावर लोकांनी मतदान केले पाहिजे, सध्या तरी लोक मला फुकट घालवत आहेत, असा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेद व्यक्त केला. राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला.

महाविकास आघाडीचे सरकार पडणार नाही!

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या भाजपकडून वारंवार तारखा दिल्या जात आहेत. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी तर मार्चमध्येच ठाकरे सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं आहे. परंतु, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही, असे विधान केले. येणाऱ्या निवडणुकीत कुणापेक्षा सोबत जाणार का, या प्रश्नावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ऐनवेळी काय घडणार हे कुणीच सांगणार नाही. युती, आघाडीचा विचार निवडणुकीच्या वेळी विचार करू. याविषयी आता माध्यमांशी बोलण्याची माझी इच्छा नाही, असेही ठाकरे म्हणाले. दरम्यान औरंगाबादला संभाजीनगर असे नाव देण्याच्या विषयावर आपण जाहीर सभेत बोलणार आहोत, असेही राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा …अन् फडणवीसांना बिलगून बावनकुळेंना आनंदाश्रू झाले अनावर)

वाझे प्रकरण मूळ मुद्यापासून भरकटले!

सचिन वाझे याने अनिल देशमुख याना क्लीन चिट दिली, हे काय चालले आपल्याला माहित  नाही. वाझे ६ महिने कारागृहात होता, ३ वर्षे बडतर्फ होता, मग तो शिवसेनेनेत गेला. उद्धव ठाकरे यांच्या जवळचा होता. तसेच मुकेश अंबानी हेही त्यांच्या जवळचे आहेत. एक जवळचा दुसऱ्या जवळच्या माणसाच्या खाली बॉम्ब ठेवतो, हे गणित अजून समजत नाही. मी आधीच बोललो होतो की, हे प्रकरण मूळ विषयापासून भरकटणार आहे. जेव्हा वाझे याने अंबानींच्या घराखाली जिलेटीनने भरलेली गाडी का ठेवली, या विषय सुटेल, तेव्हा फटाक्यांची माळ लागेल. वाझेने ती गाडी का ठेवली? हा विषय कुठच्या कुठे गेला आहे, त्यात अनिल देशमुख हा विषय तर २५ हजार फुटावरचा उंच आहे, असेही ठाकरे म्हणाले.

आरक्षणाची मागणी केवळ मतांसाठी 

आरक्षण हे शिक्षण आणि उद्योग यामध्ये दिले जाते. आता शाळा आणि उद्योग खासगी बनत आहेत, तिथे आरक्षण नाही, मग आरक्षणाची मागणी का होते? मतांसाठी ही मागणी होते, इम्पेरिकल डेटा केंद्र देत नाही आणि महाराष्ट्र सरकार ओबीसींची मोजणी करण्यासाठी ४०० कोटी देत नाही, त्यांना इच्छाशक्तीच नाही. कितीसे पैसे लागणार आहेत. त्यातून ओबीसी तरी मोजून होतील, पण नाही. मुळात महाराष्ट्रात बजबजपुरी माजवली आहे. जातीजातीचे राजकरण करून महाराष्ट्राला उत्तर प्रदेश, बिहार बनवायचा आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

एसटी कामगारांनी ताणू नये 

एसटीचे सरकारी विलनीकरण शक्य नाही. कारण इतरही महामंडळे मागणी करतील, पण वेतन न देणे, वेतन वाढ न देणे हे चुकीचे आहे. ४१ टक्के वेतन वाढ दिली आहे. कामगारांनीही अधिक  ताणता कामा नये, असेही राज ठाकरे म्हणाले.

सध्या कुठलीच लाट नाही 

सध्या तरी कोणतीही लाट दिसत नाही, जेव्हा बाबारीचा ढाचा पडला, तेव्हा लोकांमध्ये राग होता, त्या रागातून लोकांनी मते दिली, पण आता राम मंदिर होत आहे त्याचा आनंद आहे, मात्र त्या आनंदाचे मतात रूपांतर होते का, हे पहावे लागेल, असेही राज ठाकरे राम मंदिराच्या मुद्यावर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.