शिवसेनेत माझं काय स्थान असेल, याबाबत स्पष्टता आणल्यानंतरही काहींना मी नकोसा झालो. मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कुरापती केल्या, असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केला.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या पश्चात शिवसेनेत सुरू असलेल्या घडामोडींबाबत गौप्यस्फोट केला. राज म्हणाले, माझ्याविषयी बोलताना नेहमी महाबळेश्वरचा प्रसंग सांगितला जातो. पण त्याआधी काय घडलं हे सर्वांना सांगण्याची गरज आहे. जेणेकरून आता शिवसेनेवर ही स्थिती का ओढवली याचा अंदाज येईल. मला पक्षात भिंतीआड दाबण्याचा प्रयत्न होतोय, याचा मला अंदाज आला होता. माझे फोटो बॅनर, सभा वा पक्षातील कोणत्याही कार्यक्रमस्थळी लावू नका, असे आदेश काढण्यात आले होते.
त्यामुळे एकदा मी उद्धवला घेऊन हॉटेल ऑबेरॉयमध्ये गेलो. त्याला समोर बसवलं आणि विचारलं, बोल तुला काय हवंय. तुला पक्षाचा अध्यक्ष, प्रमुख व्हायचंय – हो, उद्या सत्ता आली तर मुख्यमंत्री व्हायचंय – हो. मग मी विचारलं माझं काम काय, तेवढं सांग. मला फक्त प्रचारासाठी बाहेर काढू नका तुम्ही. तेव्हा म्हणाला, मला काही प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं ठरलं मग, तर त्यावर तो हो म्हणाला. त्यामुळे मी तातडीने घरी आलो आणि बाळासाहेबांच्या कानावर घडला प्रकार घातला. त्यांना सांगितलं, सगळा प्रॉब्लेम आज संपलाय. तेव्हा बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि उद्धवला बोलवायला सांगितले. मी निरोप दिला, त्यावर साहेब पाच मिनिटांत येतील असे उत्तर आले. पण उद्धव आलाच नाही, सहायकाने सांगितले साहेब बाहेर गेलेत. कालांतराने मला हे कळलं, मी पक्षाबाहेर जावे यासाठी हे सगळे सुरू होतं, असा गौप्यस्फोट राज यांनी केला.
नारायण राणेंनी शिवसेना सोडलीच नसती
माझ्यासोबत जे घडलं, तेच नारायण राणेंच्या बाबतीतही घडलं. ते बाहेर पडताना मी त्यांना फोन केला आणि म्हणालो, मी साहेबांशी बोलतो, थांबा. मी बाळासाहेबांशी बोललोही. त्यांनी राणेंना घेऊन घरी येण्याचा निरोप दिला. तसे मी राणेंना कळवले. पण, तितक्यात बाळासाहेबांचा पुन्हा फोन आला येऊ नकोस. त्यावेळी फोनवर बाजुला कोणीतरी बोलत असल्याचे माझ्या कानावर पडले. एकुणात, ज्याप्रकारे पक्षात हे सुरू होतं, त्याचा शेवट पुढे जाऊन हा असा झाला, अशी टीकाही राज यांनी केली.
(हेही वाचा – ‘त्यांना’ मुख्यमंत्री पदी बघायला आवडेल; राज ठाकरेंच्या पत्नीची सूचक प्रतिक्रिया)
Join Our WhatsApp Community