देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत हे सांगणारा राज ठाकरे हा देशातील पहिला माणूस मी होतो. त्यांच्या पक्षातही हे कुणी म्हणत नव्हते. २०१४ ची निवडणूक झाली, त्यानंतर मी जे पाहिले ते कुठेच होताना दिसले नाही, उलट नोटबंदी, बुलेट ट्रेन सुरु झाले. मला जर गोष्टी पटल्या नाही, तर मी बोलणार. आपण त्यांनाच बोलतो, ज्यांच्यावर आपले प्रेम -विश्वास असतो. त्याला जेव्हा तडा जातो, तेव्हा राग येतो. आणि माझा राग हा टोकाचा राग असतो आणि प्रेमही टोकाचे असते. २०१९सालचा माझा तो टोकाचा विरोध होता. ज्याला लाव रे तो व्हिडीओ म्हणून नाव दिले गेले, अशा प्रकारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी २०१९मध्ये लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना केलेल्या विरोधामागील भूमिका आता स्पष्ट केली.
मुख्यमंत्री पदासाठी विरोध केला नाही
ज्या ज्या वेळी पंतप्रधान मोदी यांच्याकडून चांगल्या गोष्टी घडल्या, ३७० कलम रद्द केले तेव्हा त्यांचे अभिनंदन करणारे पहिले ट्विट माझे होते. एनआरसीच्या बाजूने मी मोर्चा काढला होता. मी व्यक्तिगत टीका कुठेही केली नाही. आज उद्धव ठाकरे आणि संजय राऊत जी टीका करतात तशी माझी टीका नाही. मला काही तरी हवे आहे, मुख्यमंत्री पद हवे आहे, म्हणून मी विरोध केला नव्हता. तुम्हाला तर तेव्हाच पटत नव्हते तर मग त्याच वेळी खिशातील राजीनामे बाहेर काढून माझ्यासोबत का आला नाहीत. नंतर मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही विरोध केला, पण माझा विरोध तसा नाही. मला पटले नाही तर मी विरोध केला आहे, असेही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.
माझा काँग्रेसशी तसा संबंध कधीच आला नाही, काँग्रेससोबत भेटी होतात, पण गाठी पडल्या भाजपावाल्यांसोबत. त्यामुळे त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित झाले, मी गुजरातला गेलो, तिथे नरेंद्र मोदी भेटले, तेव्हा गुजरातची प्रगती पाहिली. महाराष्ट्रात आल्यावर मी गुजरातचे कौतुक केले, पण महाराष्ट्र खूप पुढे आहे, असेही म्हटले, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.