मनसेचा गुढीपाडवा मेळावा गुरूवारी २२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) येथे होणार आहे. या मेळाव्याआधी मनसेकडून टीझर जारी करण्यात आला आहे. हा टीझर मनसेच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवण्याची भूमिका जाहीर सभेतून घेतली. त्याची सविस्तर बातमी हिंदुस्थान पोस्टने प्रसिद्ध केली. ती बातमी मनसेच्या टीझरमध्ये घेण्यात आली.
बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली
तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा अनुभवण्यासाठी…चला शिवतीर्थावर! असे कॅप्शन देऊन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून महाराष्ट्रातील मनसैनिकांना शिवतीर्थावर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या टीझरमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे राज ठाकरेंनी सुद्धा मशिदीच्या भोंग्यांना विरोध केला आहे, हीच खरी बाळासाहेबांचीही इच्छा होती, राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात केलेल्या यशस्वी आंदोलनामुळे बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली असे या टीझरमध्ये म्हटले आहे.
(हेही वाचा राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीचा कहर; कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान?)
टीझर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित
तसेच या टीझरमध्ये पुढे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणतात, “मी धर्मांध नाही…मी धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही, पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका. भारताच्या इतिहास पहिल्यांदाच सकाळच्या अजान बंद झाल्या. असाच तळपत्या ठाकरी विचारांचा वारसा अनुभवण्यासाठी… चला शिवतीर्थावर” असे सांगत हा संपूर्ण टीझर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला आहे.