मुख्यमंत्री विधानसभेत ठणकावून सांगत होते, माझ्या कुटुंबाला हात घालाल, तर मला आधी अटक करा. मी म्हणतो कुटुंबाला आधी सांगा महापालिकेत जाऊ नका. अरे ईडीची नोटीस मलाही मिळाली होती, हे सगळे २०१९चे सुरु आहे. मुख्यमंत्री व्हायचे होते ना, मग भोगा! राजकारण तुम्ही करता ना, मग राजकरण समोरच्यांनाही करता येते, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सध्या सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईमागील गौप्यस्फोट केला.
(हेही वाचा दाऊदशी संबंध म्हणून मलिक जेलमध्ये जातात आणि अंगठा दाखवतात! राज ठाकरेंनी डिवचले)
महापौर बंगला बिल्डरांच्या घशात टाकला
बाळासाहेबांचे स्मारक मोठे बांधा, असे माझे मत होते, म्हणून मी महापौर बंगल्याला विरोध केला होता. तुम्हाला बंगला पाहिजे होता, कारण रोज संध्याकाळी परदेशी लोकांच्या, बिल्डरांच्या गाड्या आता या महापौर बंगल्यात लागतात, नाव बाळासाहेबांचे घ्यायचे आणि मोक्याची जागा बिल्डरांच्या घशात घालायची, हे सगळे सुरु आहे. ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना आम्ही मते देणार नाही, अशी शपथ घ्या, वचक हा तुमचाच असला पाहिजे, एक दिवसासाठी मतदान करणारा मतदार नको. या देशाला महाराष्ट्राने विविध विचार दिला या महाराष्ट्राची ही अवस्था. हतबलतेने बघतो. तुम्ही कोण आहात हे आतून बघा, स्वाभिमान गहाण टाकू नका, जिवंत प्रेत बनू नका, असेही राज ठाकरे म्हणाले.
अडीच वर्षांचे कारण सांगू नका
३ वर्षांपूर्वी येथे गुढीपाडवा मेळावा झाला होता, त्यानंतर २ वर्षे घेता आला नाही. कोरोना काळात मुंबई, महाराष्ट्राच्या पोलिसांनी जे काम केले त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे, जीवाची पर्वा न करत काम केले. दोन वर्षे लॉकडाऊन होते, मोरी इतकी तुंबली आहे, बोळा घालावा कुठून हेच कळात नाही, जितके शक्य होईल तितकं साफ करु. आता लॉकडाऊन विस्मरणात गेला आहे, तसे अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या आहेत, त्यामुळे त्याची आठवण करून द्यायची आहे. २ वर्षांपूर्वी झालेल्या घटना विसरून गेलो आहे. तुम्ही विसरता हेच त्यांच्या फायद्याचे ठरते. २०१९ची विधानसभा निवडणूक आठवा. भाजप-शिवसेना विरूद्ध दोन्ही काँग्रेस निवडणूक होती. निकाल लागल्यावर उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला अडीच अडीच वर्षे. आमच्याशी कधी बोलला नाहीत. प्रचाराच्या व्यासपीठावर तुम्ही मोदींसोबत बसलात, मोदी, अमित शाह म्हणाले, ‘मुख्यमंत्री भाजपचा होईल.’ तेव्हा तुम्ही काही म्हणाला नाहीत. निकाल लागला तेव्हा टूम काढली ‘अडीच वर्ष’. अमित शहा यांच्याशी एकांतात बोललो. मग बाहेर का बोलला नाहीत? चार भिंतीत गोष्ट झाली म्हणता, तर अमित शहा म्हणतात ‘असे बोलणे झालेच नाही.’ एके दिवशी पहाटे उठतो तर जोडा वेगळाच, पळून कुणाबरोबर गेला. मतदान कुणाला केले हे कळलेच नाही. मग आवाज आला ‘ये शादी हो नही सकती.’ हे सुरु असताना शेजारच्या गॅलरीतून एक जण डोळा मारतो ‘मला कडेवर घ्या ना.’ हे मी राज्याच्या राजकारणात कधी पाहिले नाही. कारणे काय सांगता अडीच वर्षे बोलले होते. तुमचे ते झांगड होते, तुम्हाला शिवसेना-भाजप म्हणून मते दिली होती, शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस म्हणून दिली नव्हती. पण आपण विसरून जातो. याच्यासाठी मतदान केले होते का?, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community