मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खांदेपालट करण्यास सुरुवात केली. वरळीचे विभाग अध्यक्ष असलेल्या संतोष धुरी यांना पदावरून बाजूला करून वरळीतील मनसेचे पदाधिकारी असलेल्या संजय जामदार यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. बंटी म्हशीलकर आणि संजय जामदार ही जोडगोळी असून खुद्द राज ठाकरे दोघांना विनोदाने बंटी -बबली असे हाक मारतात. त्यापैकी या बंटी- बबलीपैकी बबली म्हणजेच संजय जामदार यांच्यावर वरळी विधानसभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संतोष धुरींकडे होती जबाबदारी!
मनसेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळीत मोठा फेरबदल केला आहे. वरळी विधानसभेचे आमदार हे सध्या युवा सेना प्रमुख व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आहेत. परंतु या विधानसभेची जबाबदारी राज ठाकरे यांनी संजय जामदार यांच्याकडे सोपवली आहे. सध्या या विभागाची जबाबदारी माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्याकडे आहे. धुरी आणि मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांची घट्ट मैत्री आहे. महापालिकेत एकत्रपणे नगरसेवक पद भूषवताना या दोघांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जेरीस आणले होते. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीत धुरी यांचा पराभव झाल्यानंतर मनसेने त्यांच्यावर वरळीची जबाबदारी सोपवली होती. पण आता संतोष धुरी यांना विभाग अध्यक्ष पदावरून हटवले आहे.
(हेही वाचा : शहरी नक्षलवाद प्रकरण पुणे पोलिसांकडून का घेतले? एनआयएने दिले स्पष्टीकरण!)
जामदारांनी वरळीतून विधानसभा लढवलेली!
संजय जामदार यांनी पक्षातर्फे यापूर्वी वरळी विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे पुन्हा एकदा वरळीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असल्याचे बोलले जात आहे. धुरी यांच्याकडील विविध प्राधिकरणांमधील तसेच संस्थांमधील मनसेच्या कामगार संघटनेची जबाबदारी कायम आहे.
Join Our WhatsApp Community