‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम

169

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यातील हाय व्होल्टेज उत्तरसभा मंगळवारी पार पडली. गुढीपाडव्यातील सभेत मशिदींवरील भोंगे उतरवण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या या विधानावरुन राज ठाकरे धार्मिक तेढ निर्माण करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्याला राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत उत्तर दिले आहे. 3 मे पर्यंत राज्यातील भोंगे उतरले नाहीत तर केवळ हनुमान चालिसाच नाही, माझ्या भात्यात अनेक बाण आहेत ते काढायला मला भाग पाडू नका, अशा शब्दांत त्यांनी अल्टिमेटम दिले आहे.

(हेही वाचाः ‘वसंतसेना ते शरदसेना’ असा शिवसेनेचा प्रवास! संदीप देशपांडेंनी घेतला समाचार)

3 तारखेपर्यंत ऐकले नाहीत तर…

असा कुठला धर्म आहे जो दुस-या धर्मियांना त्रास देतो. रमजान आहे आम्ही समजू शकतो, आमचाही गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव असतो. सणावारंच्या दिवसांत आपण समजू शकतो, पण 365 दिवस हे तुम्ही कशासाठी ऐकवत आहात. 3 तारखेला रमजान ईद आहे. कुठचीही दंगल, धार्मिक तेढ आम्हाला निर्माण करायची नाही. आम्हाला महाराष्ट्राचं स्वास्थ्य बिघडवायचे नाही. 12 एप्रिल ते 3 मे पर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे खाली उतरले पाहिजेत. यासाठी राज्य सरकारने सर्व मशिदींच्या मौलवींशी चर्चा करावी, 3 तारखेनंतर त्यांना आमचा कुठलाही त्रास होणार नाही, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिले आहे. 3 तारखेपर्यंत हे ऐकले नाहीत तर ज्या मशिदींच्या बाहेर भोंगे लागतील तिथे हनुमान चालिसा लागली पाहिजे, असे आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केले.

हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार

हे जर नीट सांगून समजत नसेल तर मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार. वातावरण आम्ही बिघडवत नाही आहोत. हा धार्मिक नाही तर सामाजिक विषय आहेत. विद्यार्थी, वयोवृद्ध आणि महिलांना त्याचा त्रास होतो. कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत, यावरुन आम्ही मागे हटणार नाहीत, काय करायचे ते करा, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे.

(हेही वाचाः हिंदूंनी तिसरा डोळा उघडला तर, अवघड होईल…नितेश राणे काय म्हणाले?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.