Raj Thackeray: ‘मराठी भाषेचं काय होणार यावर आक्रोश करण्यापेक्षा…’; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘X’वर शुभेच्छा देऊन राज ठाकरे यांनी व्यक्त केलं परखड मत

184
Raj Thackeray : वाढत्या उष्म्यामुळे शाळांना सुट्टी द्या

मराठी भाषा गौरव दिन सर्वत्र उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

‘फक्त आजच नाही, तर ३६५ दिवस मराठी भाषा गौरव दिन साजरा व्हायला हवा. मराठी भाषेचं काय होणार यावर आक्रोश करण्यापेक्षा, लोकांच्या बदलत्या आवडीनिवड लक्षात घेऊन त्यानुसार स्वत:ला बदलणं हे आवश्यक आहे’, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपल्या ट्विटर अकाउंटवरून याबाबत राज ठाकरे यांनी ट्विट केलं आहे. ‘X’वर ते लिहितात की, सर्वप्रथम महाराष्ट्रात, देशांत आणि जगभरात पसरलेल्या तमाम मराठी जनांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या खूप खूप शुभेच्छा. मराठीत बोलणं, या भाषेत नवनवीन ज्ञान, विचार, कल्पना जन्माला घालणं आणि त्यातून आपल्या भाषेची ताकद, त्याचा पैस, याची जगाला जाणीव करून देणं यातून आपण एक प्रकारे मराठी भाषेचा गौरव करतोच आणि खरं तर अशाच पद्धतीने फक्त आजच नाही, तर ३६५ दिवस साजरा व्हायला हवा.’

(हेही वाचा – Maharashtra Assembly Interim Budget 2024 : ईस्टर्न फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार करणार, तर ११ गड-किल्ल्यांना जागतिक दर्जाचे बनवण्याची योजना )

मागे मी म्हणलं तसं की मराठी ज्ञानाची भाषा व्हायला हवी. पण हे होत असताना बदलत्या प्रवाहांचा विचार व्हायला हवा. आजची तरुण पिढी दिवसातील बहुसंख्य वेळ विविध समाज माध्यमांवर असते. त्यातले अगदी सगळे नाही पण बऱ्यापैकी तरुण-तरुणी हे सामान्य दर्जाचे रिल्स बघण्यात त्यांचा वेळ घालवत असतात.

पण ह्याच सगळ्यांना विज्ञान ते आर्थिक संकल्पना ते अनेक विषयांवरचं माहिती, ज्ञान मराठी भाषेत मिळालं तर ते नक्की बघतील. मला माहीत आहे की आज मराठीमध्ये युट्युबसाठी खूप दर्जेदार कन्टेन्ट तयार होत आहे पण त्याचं प्रमाण निश्चित कमी आहे. आज विविध क्षेत्रांत खूप उच्च पदांवर काम करणारी मराठी माणसं आहेत, त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील अभ्यास उत्तम आहेच आणि फक्त त्यांचं ज्ञान, माहिती ही जर रंजक पद्धतीने त्यांनी ह्या समाज माध्यमांवर सांगितली तर?

विकिमीडिया फाउंडेशनचं, ‘विकिपीडिया’ तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं. ह्याच विकिमिडीया फाउंडेशनच्या ‘विकिसोर्स’, ‘विकीमीडिया कॉमन्स’, ‘विकिव्हॉयेज’, ‘विकिस्पिशिज’ सारख्या आभासी मंचांचा वापर ज्ञान मराठीतून देण्यासाठी करणं सहज शक्य आहे. विकिमिडीया सारख्या आभासी मंचावर तर ध्वनी, चित्रफीत स्वरूपात पण ज्ञान माहिती प्रसारित करणं शक्य आहे. ह्या सगळ्याचा मुक्त आणि प्रभावी वापर व्हायला काहीच हरकत नसावी. (विकिपीडिया हा ‘प्लॅटफॉर्म’ आहे पण त्याला ‘आभासी मंच’ शब्द वापरला आहे, असे पर्यायी शब्द पण प्रचलित व्हायला हवेत.)

मराठी भाषेचं काय होणार ह्यावर आक्रोश करण्यापेक्षा, लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार स्वतःला बदलणं हे अतिशय आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या मराठी इन्फ्ल्यूअन्सर्सचा सत्कार केला होता. पण मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन समाजमाध्यमांवर मराठी ही ज्ञानाची भाषा बनवणाऱ्यांचा सुद्धा योग्य आदर व्हायला हवा. ह्यासाठी नेहमीप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेईलच !

पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.