वृत्तवाहिनीवर राज ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध झाली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राज ठाकरे या मुलाखतीत मनसोक्त बोलले. अनेक विषयांवर चर्चा झाली. मनसेची पुढची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पण सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे त्यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू उद्धव ठाकरेंविषयी केलेली टिप्पणी.
उद्धव ठाकरे हे संयमी आहेत, शांत आहेत असं प्रमोशन गेली अडीच वर्षे मीडियाने केलं होतं. राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आता मीडियाने उभी केलेल्या उद्धव ठाकरेंच्या प्रतिमेवर संशय व्यक्त केला जात आहे. राज ठाकरे म्हणाले की, “तो माणूस बोलतो वेगळे आणि करतो वेगळे. विश्वास ठेवण्यासारखा नाही. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहिती नाही, तेवढा मला माहीती आहे.”
याचा अर्थ उद्धव ठाकरे समाजात वावरतात तसे शांत किंवा संयमी नाहीत. महत्वाचे म्हणजे ते बोलतात वेगळे आणि करतात वेगळे, याचा अर्थ ते फसवतात असं राज ठाकरेंना म्हणायचं आहे का? उद्धव ठाकरेंची इमेज बिल्डिंग मीडियाने खूप चांगल्या प्रकारे केली होती. मंत्रालयात न जाता, कार्यालयाची पायरी न चढता त्यांना बेस्ट सीएम ची उपाधी दिली गेली. जे लोक त्यांच्यावर टीका करत होते, त्यांना खोटं ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. पण जेव्हा एकनाथ शिंदेंनी उठाव केला तेव्हा लोकांना कळलं की विरोधकांनी केलेली टीका ही खरी होती.
कारण सर्व उठाव केलेल्या आमदारांच्या बोलण्यावरुन असं वाटतं की उद्धव ठाकरे हे काम करत नाहीत. ते नेते होण्यास सक्षम नाहीत. ते संयमी आहेत असं म्हटलं जातं. साधू हत्याकांड झाल्यावर त्यांनी कारवाई न करता संयम पाळला. जितेंद्र आव्हाड यांच्यावर अनंत करमुसे या निष्पाप तरुणाला बंगल्यावर नेऊन मारल्याचा आरोप झाला, तेव्हा त्यांनी संयम पाळला, कोरोनाचं संकट महाराष्ट्रावर कोसळलं असताना त्यांनी संयम पाळत महाराष्ट्राला वाचवण्याऐवजी घरात बसत संयम पाळला. कॉंग्रेसने सावरकरांवर गलिच्छ टीका केली तेव्हा त्यांनी विरोध न करता संयम पाळला. त्यांनी पाळलेल्या संयमाची यादी खूप मोठी आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केलेली टिप्पणी अत्यंत बोलकी आहे. म्हणजे ते जसे समाजात दिसतात अगदी त्याविरोधी त्यांचा स्वभाव आहे का? अशी शंका कुणी घेतली तर वावगं ठरु नये. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं असंच राज ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं असेल.
Join Our WhatsApp Community