मुंबई सत्र न्यायालयाने गुरूवारी मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटी-शर्थींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांना चकवा देत हे दोघेही शिवाजी पार्क परिसरातून पळून गेले होते. अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यामुळे संदीप देशपांडेंना मोठा दिलासा मिळाला आहे. या दोघांचाही जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी आज, शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थावर दाखल होत भेट घेतली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यांच्या कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती अद्याप समोर आली नाही.
अटकेची टांगती तलवार दूर
मनसेच्या आंदोलनादरम्यान, शिवाजी पार्क पोलिसांना या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. या नंतर गेल्या अनेक दिवसांपासून संदीप देशपांडे आणि संतोष धुरी कोणाच्याही संपर्कात नव्हते. पोलिसांनी त्यांना अटक करण्यासाठी पथकही तयार केले होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाही. दरम्यान, या दोघांनीही अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर गुरूवारी या दोघांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांच्यावरील टांगती तलवार दूर झाली.
(हेही वाचा – राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित! जाणून घ्या ‘राज’ की बात…)
काय आहे प्रकरण?
मनसे आंदोलनादरम्यान शिवतीर्थ या निवास्थानाबाहेर पोलिसांकडून धरपकड होणार असे लक्षात येताच, देशपांडे आणि धुरी आपल्या गाडीत बसून फरार झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी वाहनचालकाने वाहन अचानक पळवल्याने धक्का लागून एक पोलीस महिला खाली पडली आणि जखमी झाली. देशपांडे, धुरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी हेतूत: हे कृत्य केले, असा आरोप यावेळी पोलिसांकडून करण्यात आला होता. यानंतर या मनसे नेत्यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या दोघांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती आता जामीन अर्ज मंजूर झाल्यामुळे देशपांडे आणि धुरींना मोठा दिलासा मिळाला आहे.
Join Our WhatsApp Community