-
प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावर कार्यकर्त्यांना पुढील दिशा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, रविवारी झालेल्या या सभेत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट रणनीती देण्यात अपयश स्वीकारले. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर बनला असताना, या भाषणातून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमच वाढला आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका आणि त्यांच्यासोबत जाण्याची परस्परविरोधी भाषा यामुळे मनसेची दिशा काय, हेच अस्पष्ट राहिले.
कार्यकर्त्यांना दिशाहीनता
शिवतीर्थावरील मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नेहमीप्रमाणे प्रभावी शैलीत भाषण केले. पण या भाषणातून कार्यकर्त्यांना सुसंगत कार्यक्रम किंवा ठोस मार्गदर्शन मिळाले नाही. विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर पक्षाला उभारी देण्यासाठी कार्यकर्ते उत्सुक होते. मात्र, “पुढे काय करायचे?” या प्रश्नाचे उत्तर राज ठाकरे यांच्याकडून मिळाले नाही. एका कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “आम्हाला आता काय करावे, हे समजत नाही. साहेबांचे भाषण ऐकायला छान वाटते, पण त्यातून दिशा मिळत नाही.”
(हेही वाचा – Bihar मध्ये धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंच्या चैत्र नवरात्रीच्या शोभायात्रेवर दगडफेक)
सत्ताधाऱ्यांबाबत संदिग्धता
भाषणात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर कधी टीकेची झोड उठवली, तर कधी त्यांच्यासोबत जाण्याचे संकेत दिले. “सत्ताधाऱ्यांनी चुकीचे निर्णय घेतले,” असे म्हणताना त्यांनी भाजपा आणि शिवसेना यांच्यावर निशाणा साधला. पण लगेचच, “आम्ही आमच्या ताकदीवर लढू, पण गरज पडली तर योग्य वेळी निर्णय घेऊ,” असेही ते म्हणाले. या परस्परविरोधी विधानांमुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ वाढला. मनसे स्वबळावर लढणार की महायुतीत सामील होणार, हे स्पष्ट झाले नाही.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोलापूरकर आणि कोरटकर यांसारख्या स्थानिक विषयांना हातही लावला नाही. हे मुद्दे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात होते. त्याऐवजी त्यांनी सामान्य मराठी माणसाच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला, पण ठोस आश्वासन किंवा योजना सांगितली नाही. “मराठी माणूस हा आमचा आधार आहे,” असे त्यांनी ठासून सांगितले, पण त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड कशी द्यायची, याबाबत मौन बाळगले.
(हेही वाचा – Kisan Credit Card ची मर्यादा 5 लाखांवर ; आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये नवा नियम लागू होणार !)
महापालिका निवडणुकीआधी संभ्रम
आगामी महानगरपालिका निवडणुकीत मनसेला आपले अस्तित्व टिकवायचे असेल, तर स्पष्ट रणनीती आणि कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे गरजेचे आहे. मात्र, शिवतीर्थावरील भाषणात “काय करावे आणि काय करू नये” याबाबत कोणतीही सुस्पष्टता आली नाही. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली असून, “आम्हाला आता निवडणुकीसाठी तयारी कशी करायची?” असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे शिवतीर्थावरील भाषण पुन्हा एकदा शब्दांचा खेळ ठरले. कार्यकर्त्यांना प्रेरणा आणि दिशा देण्यात ते असफल ठरले. महापालिका निवडणुकीआधी मनसेसमोर असलेली दिशाहीनता आणि संभ्रम यामुळे पक्षाचे भवितव्य आणखी अंधारात गेले आहे. आता राज ठाकरे यांना ठोस कृतीशिवाय पर्याय उरलेला नाही, अन्यथा मनसेचे राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची भीती आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community