Raj Thackeray यांचे आता मनसैनिकांना फर्मान, ‘मराठीचे आंदोलन तूर्तास थांबवा!’

मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील, असा इशाराही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला.

96

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मनसैनिकांना ‘उद्यापासून बँकांमध्ये जा, तिथे मराठी भाषा वापरली जाते का हे पहा, मराठीचा अवमान केला तर कानाखाली वाजवली जाईल;, असा आदेश दिला होता. त्यानुसार मनसैनिक बँकांमध्ये जाऊ लागले आणि मराठीची आग्रह धरू लागले. शनिवारी, ५ एप्रिलला राज ठाकरे यांनी सोशल मीडियात एक पत्र पोस्ट केले, त्यामध्ये त्यांनी मनसैनिकांना आता मराठीचे आंदोलन तूर्तास थांबवा!, असा आदेश दिला आहे.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात म्हटले आहे की, सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं; यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसंच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली.”

(हेही वाचा मराठी भाषा संवर्धनासाठी राज ठाकरे आणि राज्य सरकार एकत्र येणार : Uday Samant शिवतीर्थावर दाखल)

हे आंदोलन आता थांबवायला हवं

“पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची?”, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

मराठीचा सन्मान करायला लावा

“आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यामांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की”, असं आश्वासनही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलं. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका! सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील, असा इशाराही राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.