मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरच बसून तसेच फेसबुकच्या माध्यमातून सल्ले देत आहेत. प्रत्यक्षात काही करत नाहीत अशी टीका विरोधी पक्षाकडून होत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील विरोधकांच्या सूरात सूर मिळवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी, आपण फक्त उद्धव ठाकरे यांनी टीव्हीवरच बघितले, कारभार करताना पाहिलेच नाही असे म्हटले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मला टीव्हीवरच दिसले. पण त्यांचा कारभार दिसला नाही. सरकारने कारभाराला सुरुवात केली आणि कोरोना आला. त्यांच्या कारभाराबद्दल फार काही बोलता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस राज्यभर फिरत आहेत. पण मुख्यमंत्री बाहेर फिरताना दिसत नाहीत. तसेच तुम्हीसुद्धा घराबाहेर पडला नाहीत? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, मी बाहेरच असतो, इथे माझ्या कार्यालयात बैठका होतात. मुख्यमंत्री शासकीय पदावर आहेत. त्यामुळे त्यांनी बाहेर गेलेच पाहिजे. त्यांना पक्षातील लोकांशी बोलायचे नाही. त्यांना अधिकाऱ्यांच्या बैठका घ्यायच्या असतात.
मी घराबाहेर पडलो तर, माझ्याभोवती लोकांची गर्दी जमा होणार. त्यातून संसर्गाची भीती होती. म्हणून मी बाहेर गेलो नाही. पण सरकारमधल्या लोकांनी मात्र घराबाहेर पडणे आवश्यक होते. आता लॉकडाउनमधून सोडवा अशीच सर्व लोकांची इच्छा आहे. लोकांच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. लॉकडाऊन फार काळ करता येणार नाही. विरोधी पक्षाबद्दल बोलण्याची ही वेळ नाही लोकांच्या मनातील भीती दूर होण्याची गरज आहे. लॉकडाउनमुळे गेले काही महिने सूर्यप्रकाश ज्यांच्या घरापर्यंत पोहोचलेला नाही. त्याची अवस्था काय असेल याचा विचार करा, असेही राज ठाकरे म्हणाले.
Join Our WhatsApp Community