पुण्यात राजगर्जना: बृजभूषण सिंह यांचा घेणार समाचार?

95

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यापासून सभांचा सपाटा लावला आहे. हजारोंच्या उपस्थितीत सभांमधून राज ठाकरे भूमिका मांडत असल्याने राज्यातील राजकरणात उलथापालथ होत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही राज ठाकरे यांना उत्तर देण्यासाठी सभाच घ्यावी लागली. राज ठाकरे यांची चौथी सभा पुण्यात होणार आहे. त्या सभेच्या आधीच राज ठाकरे यांनी त्यांचा ५ जून रोजीचा पूर्वनियोजित अयोध्या दौरा स्थगित केला आहे. या दौऱ्याविषयी आधीपासूनच टीकाटिपण्णी होत आहे. विशेष म्हणजे भाजपचे उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्याची चर्चा जोरदार रंगली होती. त्यामुळे राज यांचा अयोध्या दौर स्थगित होण्यामागे नेमके कोणते कारण आहे, हे राज ठाकरे पुण्याच्या सभेत स्पष्ट करतील, अशी शक्यता आहे.

अयोध्येच्या दौऱ्याची नवीन तारीख सांगणार?

राज ठाकरे सध्या कोणतीही भूमिका थेट सभांमधून मांडत आहेत. यामुळे एका बाजूने ते एकाच वेळी लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचतात, तसेच जिल्ह्याजिल्ह्यात सभा घेऊन राज ठाकरे हे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करत आहेत. त्यांच्या सभांचा परिणाम होतो, म्हणून राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात जी भूमिका घेतली, त्यामुळे सरकारही डगमगले होते. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर उत्तर प्रदेशातील योगी सरकारने मशिदींवरील भोंगे उतरवले. देशभरात हनुमान चालीसा म्हणणे सुरु झाले. त्याच दरम्यान राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचे घोषित केले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र काहीच दिवसांत उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्येच्या दौऱ्याला विरोध केला. जोवर राज ठाकरे उत्तर भारतीयांना मारहाण केल्याप्रकरणी माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा निश्चय खासदार सिंग यांनी केल्यामुळे राज ठाकरे यांचा दौरा बराच चर्चेत आला. त्यावर शिवसेनेने राज ठाकरे यांना डिवचले. मात्र मागील २-३ आठवडे राज ठाकरे यावर काहीही बोलले नाही. आता राज ठाकरे २२ मे रोजी पुण्यात सभा घेणार आहेत, परंतु त्या आधीच राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा स्थगित केला. त्यामुळे राज ठाकरे पुण्यातील सभेत हा दौरा स्थगित करण्यामागे नक्की काय कारण होते, याचा खुलासा करण्याची शक्यता आहे. त्यावेळी राज ठाकरे खासदार बृजभूषण सिंह यांचा समाचार घेणार का, तसेच अयोध्या दौऱ्याची नवीन तारीख जाहीर करणार का, हे  पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(हेही वाचा ज्ञानव्यापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुचवले ‘हे’ तीन पर्याय)

वसंताची नाराजी दूर करणार का? 

तसेच राज ठाकरे यांनी भोंग्यांचा विषय घातल्यापासून या विषयाला विरोध करणारे पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हेदेखील चांगलेच चर्चेत आले. मोरे यांनी विरोध केल्याने त्यांना तडकाफडकी पुणे शहर अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. मनसेच्या पुणे कोर कमिटीची बैठक झाली, त्यातही मोरे यांचे नाव गायब होते. यामुळे मोरे आणखी नाराज झाले आहेत.आपली नाराजी राज ठाकरे स्वतः दूर करतील, असे वसंत मोरे वारंवार सांगत आहेत. त्यामुळे राज ठाकरे हे पुण्याच्या सभेत वसंत मोरे यांच्या नाराजीवरही काय मतप्रदर्शन कारणार हे पाहावे लागणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत सभा घेतली तेव्हा राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेची थट्टा करत राज ठाकरे यांना मुन्नाभाईची उपमा दिली. त्यावरही राज ठाकरे काय बोलणार यावर सर्वांच्या नजर लागल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.