राज ठाकरेंचे लटकेंवरील प्रेम त्यांच्या मृत्यू पश्चातही कायम

163

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत उध्दव ठाकरे शिवसेना गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी असून त्यांच्या विरोधात भाजपने आपला उमेदवार देऊ नये अशाप्रकारचे पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्यानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्राबाबत तर्कवितर्क लढवले जात असले तरी प्रत्यक्षात रमेश लटके हे राज ठाकरे यांच्या विश्वासातील होते. भारतीय विद्यार्थी सेनेत असताना लटके हे राज ठाकरे यांच्या विश्वासातील असल्याने जेव्हा जानेवारी २००६मध्ये जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा लटके हे मनसेत जाण्याची शक्यता होती, पण शिवसेनेने त्यांना विधी व महसूल समितीचे अध्यक्ष देऊन लटकेंना मनसेत जाण्यापासून रोखले होते.

( हेही वाचा : आदर्श महापौर पुरस्कारासाठी मुंबईतील या ५० शिक्षकांची झाली निवड )

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके हे २०१४ आणि त्यानंतर २०१९मध्ये शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले. त्याआधी ते महापालिकेत नगरसेवक म्हणून सातत्याने निवडून येत होते. शिवसेनेत असताना राज ठाकरे अध्यक्ष असलेल्या भारतीय विद्यार्थी सेनेतील ते सक्रिय कार्यकर्ते होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या भारतीय विद्यार्थी सेनेचे कोल्हापूर संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी लटके यांनी योग्यप्रकारे पार पाडून आपल्यातील नेतृत्व गूण दाखवून दिले. पण जानेवारी २००६मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांच्या बंडानंतर तत्कालिन नगरसेवक असलेल्या रमेश लटके हेही शिवसेना सोडून राज ठाकरे यांच्यासोबत मनसेत जातील अशाप्रकारची हवा पसरली होती. लटके हे मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा असल्याने शिवसेनेने प्रथम त्यांना भारतीय विद्यार्थी सेनेच्या कोल्हापूर संपर्क प्रमुख पदावरुन बाजूला केले. परंतु त्याच वर्षी महापालिकेच्या विविध समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लटके यांचा विचार विधी व महसूल समितीच्या अध्यक्षपदी करत त्यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे सन २००६-०७च्या विधी व महसूल समिती अध्यक्षपदासाठी रमेश लटके यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे पुढे लटकेंच्या मनातून राज ठाकरेंसोबत जाण्याचा विचार निघून गेला आणि लटके यांनी मग शिवसेनेतच राहण्याचा निर्धार केला.

भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये लटके हे राज ठाकरेंचे विश्वासू मानले जात होते. त्यामुळे लटकेंवरील ते प्रेम त्यांच्या मृत्यू पश्चातही जागे झाले आणि त्यांच्या पत्नीला राजीनामा मंजूर करून उमेदवारी अर्ज भरेपर्यंत झालेल्या यातनांचा विचार करता राज ठाकरे यांनी या निवडणुकीत मध्यस्थीची भूमिका पार पाडत ऋतुजा लटके यांचा विजय सुकर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

राज ठाकरे यांनी, भाजपच्या सांगण्यानुसार हे पत्र दिल्याचा आरोप तथा अपप्रचार आता शिवसेनेकडून केला जात आहे. भाजपला आपला पराभव डोळ्यासमोर दिसल्याने त्यांनी राज ठाकरेंचे बाहुले म्हणून वापर केल्याचाही अपप्रचार सुर असला तरी लटकेंवर त्यांचा असलेला विश्वास आणि त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कुटुंबांला अधिक यातना होऊन निवडणूक अधिक कठीण होऊ नये म्हणून मैत्री खातर या प्रकरणात त्यांनी मारलेली ही उडी असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे कोणत्याही पोटनिवडणुकीत उमेदवार उभे न करण्याचा निर्धार करणाऱ्या मनसेची भूमिका ही या निवडणुकीत तटस्थ राहण्याची होती आणि तटस्थ राहिल्यास ऋतुजा लटके यांना याचा फायदा झाला असता. कारण या मतदार संघात मनसेचे संदीप दळवी यांना २०१९च्या निवडणुकीत ९ हजार मते मिळाली होती, तर सन २०१४च्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला २५ हजार मतदान झाले होते. त्यामुळे पाच वर्षांत मनसेचे मतदार सुमारे १५ हजार मतदान कमी झाले होते. त्यामुळे सध्या यांच्याकडील ९ हजार मतदान हे तटस्थ राहिल्याने कोणालाच फायदा झाला नसता, परंतु हे मतदान शिवसेनेलाही होऊ शकले असते सावध पाऊल उचलत राज ठाकरे यांनी आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्याच्या बायकोचा विजय सुकर करताना भाजपसोबतचे मैत्रीपूर्ण संबंधही कायम राखण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.