Raj Thackeray: पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही! राज ठाकरेंनी ठणकावलं

51
Raj Thackeray: पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होउ देणार नाही! राज ठाकरेंनी ठणकावलं
Raj Thackeray: पाकिस्तानी चित्रपट भारतात प्रदर्शित होउ देणार नाही! राज ठाकरेंनी ठणकावलं

फवादचा ‘लिजेंड ऑफ मौला जट्ट’ (The Legend of Maula Jatt) चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी (Raj Thackeray) दिला आहे. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विरोध करण्यात येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर चित्रपटाचा विरोध केला आहे आणि ट्वीट करुन इशारा दिला आहे. फवाद खान आणि माहिरा खान यांचा बहुचर्चित पाकिस्तानी चित्रपट ‘द लेजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट येत्या 2 ऑक्टोबर रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.

(हेही वाचा-Tirumala Prasadam : प्रसादातील भेसळीची CBI किंवा SIT चौकशी करा; सर्वोच्च न्यायालयात याचिका)

राज ठाकरे (Raj Thackeray) ट्विट करत म्हणाले, “फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, ‘लिजेंड ऑफ मौला जट’ नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात? आणि कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे, पण पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर जो देश तगला आहे, अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरु आहे? महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे.”

(हेही वाचा-Jammu News: जम्मूच्या आरएसपुरामध्ये सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला; बीएसएफने केला दारूगोळा जप्त)

“अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा रिलीज होऊ दिला जाणार नाही, हे नक्की. या आधी असे प्रसंग जेव्हा आले होते तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे की उगाच सिनेमा प्रदर्शित करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरु होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा अशी माझी इच्छा नाही आणि तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसणार आणि उगाच संघर्ष आम्हाला पण नको आहे.” (Raj Thackeray)

“त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं. मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशीच माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल याची मला खात्री आहे.” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. (Raj Thackeray)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.