राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय तिरकस शब्दांत टीका केली. तर दुसरीकडे भाजपच्या सुरात सूर मिळवल्यासारखे चित्र निर्माण केले. हाच धागा पकडून ह्या गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरेंवर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अपेक्षेप्रमाणे टीका करण्यात आली. ह्या टीकेची तीव्रता इतकी होती की, राज ठाकरेंना अखेर उत्तरसभा घेऊन ह्या टीकेला उत्तर द्यावे लागले. एका सभेतील भाषणावर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी दुसरी सभा घ्यावी लागली, हाच मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच १० दिवसांतील दोन सभांमधून दिसलेले राज ठाकरे दखल घ्यावे, असेच आहेत.
दोन वर्षांनंतर होणारा पक्षाचा मेळावा, त्यातच जवळ आलेली मुंबई महापालिका निवडणूक ह्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणाकडे सगळ्यांचेच लक्ष होते. विशेषत: राज काय आणि किती आक्रमक भूमिका घेतात याची मनसेच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता होती. राज यांनी भाषणातून काय मुद्दे मांडले, ते योग्य की अयोग्य हा मुद्दा गौण ठरतो. त्यांनी पक्षासाठी, आपल्या कार्यकर्त्यांसाठी भाषाणातून नेमकी काय दिशा दिली, ह्याचा विचार केला तर ह्या निकषावर राज अपयशी ठरले, असे म्हणावे लागेल. मशिदींवरील भोंगे हटवण्याचा मुद्दा हा विचार म्हणून याेग्य ठरला असला, तरी एवढेच पुरेसे नसते. पक्ष आणि कार्यकर्त्यांसाठी रचनात्मक असे काहीही त्या भाषाणातून मांडण्यात त्यांना यश आले नाही. याउलट त्यांनी ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला, त्याचा सूर हा भाजपच्याच विचारांशी जुळणारा होता. राज यांच्या ह्या भाषणातील मुद्यांची मांडणी आणि भाषेचा आवेश पाहता भाजपच्या मेळाव्यात राज बोलताहेत की काय, असा संभ्रम निर्माण व्हावा अशी स्थिती होती. त्यामुळेच ह्या सभेनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांच्या भाषणावर टीका झाली.
याउलट राज यांची ठाण्यातील उत्तरसभा होती. ह्या सभेचे मूळ उद्दिष्टच महाविकास आघाडीतील नेत्यांचा समाचर घेणे हे होते. तरीही ह्या सभेचा एकूण परिणाम हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला. कारण राज यांच्या भाषणाची एकूणच मांडणी ही त्यांच्या मूळ स्वभावाला साजेशी अशी होती. कोणाची तरी विचारधारा भाषणातून रेटण्याचे दडपण बहुधा त्यांच्यावर नसावे. म्हणूनच ठाण्यातील राज ठाकरे आपल्या नेहमीच्या लयीत, तितकेचे परिणामकारक दिसले. भाषणातील भोंग्यासहितचे सगळे मुद्दे तेच होते, तरीही हे भाषण वेगळे होते, त्याचे कारण यातच दडलेले आहे. ठाण्यातील भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मनसेच्या नेत्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. महाविकास आघाडीतील नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. पण ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी मनसे होती, हे प्रत्येकवेळी भाषेतून, देहबोलीतून प्रतिबिंबित होत होते. ‘हे आपले राज ठाकरे आहेत’, हे वातावरण ठाण्याच्या भाषणातून राज ठाकरे यांनी समर्थकांमध्ये निर्माण केले. याचा प्रकर्षाने अभाव गुढीपाडवा मेळाव्यात पाहायला मिळाला होता.
गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज यांच्यावर महाविकास आघाडीकडून चौफेर शाब्दिक हल्ला झला. त्या तूलनेत ठाण्याच्या सभेनंतर प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना फार काही तर्कसंगत उत्तरे देता आलेली नाहीत. हेच चित्र खूप बोलके आहे. राज ठाकरे यांनी याची नोंद नक्कीच घेतलेली असणार. मास लीडर असणाऱ्या नेत्याला एवढी जाणीव तर निश्चितच असेल. खरे तर गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज यांच्यावर झालेली टीका त्यांना एका अर्थाने फायद्याचीच ठरली असे म्हणावे लागेल. कार्यकर्त्यांना हवे असलेले राज म्हणूनच तर त्यांना ठाण्यातच्या सभेत पुन्हा भेटले!
Join Our WhatsApp Community