राज ठाकरेंवर राष्ट्रवादीने का केला ‘ट्विटर’ हल्ला?

प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार ट्विटरवर टाकून राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

227

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विषय आमच्यादृष्टीने संपलेला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले असले, तरी प्रत्यक्षात त्यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवर प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकातील एक संदर्भ पोस्ट केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्यावर हल्ला चढवत, ‘उशीर लागला पण पवारसाहेबांचा सल्ला गांभिर्याने घेतलेला दिसतो आहे’, असे सांगत ‘प्रबोधनकार वाचण्यास सुरुवात केली आहे, तर आता त्यांचे विचारही आत्मसात करा’, असेही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. याला मनसैनिकांकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. भलेही या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर भिडले नसले तरी सोशल मिडियात मात्र एकमेकांशी भिडत असताना पहायला मिळत आहे.

राज म्हणतात, जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही!

एका बाजुला राज ठाकरे यांच्या विधानाची दखल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून घेतली जात नसतानाच राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रबोधनकार ठाकरे यांच्या ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकातील एक विचार पोस्ट केली. ज्यात प्रबोधनकारांनी असे म्हटले आहे की, ‘जिथे चिकित्सा-स्वातंत्र्य नाही, तिथे बौध्दिक विकास नाही. जिथे बौध्दिक विकासाला बंदी, तिथे राज्यकर्त्यांनी समाज-विकासावर मोठमोठी व्याख्यान देणे म्हणजे बांडगुळानेच झाडाचे रक्त शोषणे होय!’ अशा पुस्तकातील मजकुराची पोस्ट केली आहे. या प्रबोधनकारांच्या विचारांच्या मजकुरातून एकप्रकारे राज ठाकरे यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तुटून पडले असून त्यांनी साहेबांच्या सांगण्यावरून प्रबोधनकारांची पुस्तके वाचायला घेतली काय, असा सवाल करत ‘जर वाचत असाल तर अमलही करा’ असे सांगण्यात येत आहे.

https://twitter.com/SachinsSpeech/status/1428993612587536386?s=20

तर काहींनी ‘प्रबोधनकारांचे वारस म्हणून मिरवणे सोपे आहे परंतु वारसा चालवण्यासाठी तितकी प्रगल्भता लाभणे कठीण आहे,’ असेही म्हटले.

त्यावर मनसैनिकांकडून ‘साडेतीन जिल्ह्यातील राजकारण करणारे प्रबोधकारांविषयी बोलतात हे हास्यास्पद आहे’, अशा शब्दांत समाचार घेतला.

अजित पवार म्हणतात, आमच्यादृष्टीकोनातून विषय संपला! 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा सर्वार्थाने मोठा झाल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याचा समाचार घेत, त्यांच्यावर त्यांनी न बोललेलेच बरे, त्यांनी प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असा सल्ला मुंबईतील एका पत्रकार परिषदेत दिला. त्यावर राज ठाकरे यांनी ‘आपण प्रबोधनकारही वाचले आणि यशवंतरावही’, असे सांगितले. तर बारामती येथील कोविड प्रतिबंधक उपाययोजनांच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले कि, सारखे सारखे शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रयत्न करू नका, तो विषय आमच्यादृष्टीकोनातून संपलेला आहे. ज्या लोकांना कुठेही काही थारा नाही ते लोक अशा प्रकारची नको ती विधान करत असतात. त्यामुळे हा विषय संपलेला असल्याचे सांगत राज ठाकरेंवर निशाणा साधला. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याचा समाचार घेत ‘हे दडपशाहीचे सरकार नाही. प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे, अशा बोलण्याने ते काही खरे होत नाही’, असे सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.