Raj Thackeray : ….तर गालावर वळ उठतील; राज ठाकरे यांचा इशारा

173
Raj Thackeray : ....तर गालावर वळ उठतील; राज ठाकरे यांचा इशारा
Raj Thackeray : ....तर गालावर वळ उठतील; राज ठाकरे यांचा इशारा

मुंबईत मराठी माणसाला घर, कार्यालयासाठी जागा नाकारण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. मुंबईत, महाराष्ट्रात जर पुन्हा हे असे काही घडले तर गालावर वळ उठतील हे निश्चित, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी दिला. अशा घटनेबद्दल राज्य सरकारने पण जरा आपला धाक दाखवला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

तृप्ती देवरुखकर या मुलुंड येथे कार्यालयीन कामकाजासाठी जागा शोधत होत्या. त्यासाठी त्यांनी मुलुंड पश्चिम येथील शिवसदन इमारतीच्या सचिवांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांना मराठी माणसाला येथे जागा देणार नाही, असे उर्मटपणे सांगितले. या संतप्त प्रकाराबद्दल तृप्ती देवरूखकर यांनी परवा, गुरुवारी समाज माध्यमावर व्हिडीओ प्रसारित केला. या व्हिडीओचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले. मनसेच्या मुलुंडमधील कार्यकर्त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित व्यक्तीला जाब विचारला तसेच त्याच्याकडून माफीनामा लिहून घेतला.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज ट्विटवरून आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत, मुलुंडमध्ये एका मराठी स्त्रीला, ती मराठी आहे म्हणून व्यवसायासाठी जागा नाकारल्याची घटना समोर आली. इतरांनी निषेध वैगरे व्यक्त केला. आम्हाला निषेध नोंदवणं इत्यादी प्रकार माहित नाहीत. त्यामुळे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी आमच्या पद्धतीने दम दिल्यावर त्या बिल्डिंगच्या सचिवाने माफीनामा दिला. काल मुलुंडमध्ये माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन जी समज दिली त्यांचं मनापासून अभिनंदन. तुमचं कायम लक्ष असतंच आणि मराठी माणसावर कुठेही अन्याय झाला तर त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच आठवते. हे असंच सुरु राहिलं पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे!, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

तातडीने कारवाई करा : वडेट्टीवार

दरम्यान, या प्रकाराबद्दल महायुती सरकारने कोणत्याही वोट बँकेची चिंता न करता संबंधित व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

मुंबईतून महाराष्ट्र हळूहळू वजा कसा करण्यात येत आहे त्याचे हे आजचे प्रकरण उत्तम उदाहरण आहे. जी मुंबई मराठी माणसांची आहे तिथे त्यांनाच जागा नाही असे म्हणत मराठी माणसांचा द्वेष करणारे कोण आहेत? भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एका विशिष्ठ धर्मातील लोकांबद्दल असलेला द्वेष आपण मागील आठवड्यात एका भाजप खासदाराच्या भाषेतून बघितला. हा द्वेष आता मराठी माणसाकडे यायला लागला का? असा सवाल करत वडेट्टीवार यांनी जात-पात, धर्म, भाषेला पकडून जो द्वेष पसरवण्यात येत आहे तो थांबला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

(हेही वाचा – Overseas Debt : भारतावरील विदेशी कर्जात वाढ, रिझर्व्ह बँकेकडून आकडेवारी जाहीर)

कायद्याचा धाक दाखविणार की गप्प बसणार?

ही चीड आणणारी घटना आहे. पण प्रश्न हा आहे, की हे पाहून मिंधे-भाजप सरकार काय करणार? आमच्या मराठमोळ्या वारकऱ्यांवर, बारसूमधल्या महिलांवर, मराठा समाजावर लाठ्या चालवल्या. तसा इथेही कायद्याचा धाक दाखवणार, की दिल्लीश्वर नाराज होतील म्हणून ‘हाताची घडी तोडांवर बोट’ ठेवून गप्प बसणार? असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विटवरून केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.