राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा सक्रीय होणार आहेत. यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. मनसे निवडणुकांसाठी सज्ज झाली असून, त्याची सुरुवात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यापासून होत आहे. राज ठाकरे हे येत्या १४ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत.
मनसेही प्रत्यक्ष मैदानात उतरणार
महाराष्ट्रात आगामी काळात महापालिकांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागले आहेत. इतर पक्षांकडून जिल्हानिहाय आढावा बैठका सुरू आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच मनसेही प्रत्यक्ष मैदानात उतरणार आहे. तशी तयारी आतापासूनच मनसेकडून सुरू आहे. राज ठाकरे यांच्या नवीन घरातच पक्षाचे नेते आणि सरचिटणीस यांची विशेष बैठक पार पडली.
(हेही वाचा मराठी साहित्य संमेलन नव्हे, भुज ‘बळ’ संमेलन!)
असा असेल दौरा
राज्यात येत्या काळात महापालिका निवडणुकांबरोबरच इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी मनसे सज्ज झाली आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याची आखणी केली आहे. राज्यातील सहा विभागांमध्ये हे दौरे होणार आहेत. राज ठाकरे हे सुरुवातीला मराठवाड्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १४ डिसेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दिवशी राज ठाकरे औरंगाबादमध्ये जातील. कोरोना नियमांचे पालन करतानाच, तिथे होणाऱ्या बैठकांमध्ये परवानगी मिळेल, तेवढ्याच कार्यकर्ते आणि नेत्यांची उपस्थिती असेल. राज ठाकरे या बैठकांमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यानंतर राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही जाणार आहेत.
Join Our WhatsApp Community