मनसे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही महिन्यांपासून विविध विषयांमुळे चर्चेत येत आहेत. आता पुन्हा राज ठाकरे चर्चेत आले आहेत. निमित्त आहे त्यांना झालेला कोरोनाचा संसर्ग! एका बाजूला त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया आहे आणि दुसरीकडे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. त्यातच त्यांचा १४ जून रोजी वाढदिवस येत आहे. त्यानिमित्ताने त्यांनी कार्यकर्त्याना महत्वाचा संदेश दिला आहे. ‘मी धोका पत्करू इच्छित नाही’, असे ऑडिओ संदेशात त्यांनी म्हटले आहे.
वाढदिवसाला कुणालाही भेटणार नाही
राज ठाकरे यांचा १४ जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना ऑडिओ संदेश दिला आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणाले आहे की, माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या एका डेड सेल मुळे ती शस्त्रक्रिया नियोजित वेळी करता आली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी १०-१५ दिवस घरात क्वारंटाइन राहिलो आहे. आता पुढील आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र याच दरम्यान, येत्या मंगळवारी (१४ जून) माझा वाढदिवस आहे. या वाढदिवशी दरवर्षी अनेक महाराष्ट्र सैनिक मला भेटतात. त्यातून त्यांना आणि मलाही समाधान मिळते. पण या वर्षी मात्र मला वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नये, कारण मला कोणालाच भेटता येणार नाही. माझ्या शस्त्रक्रियेला आधीच विलंब झाला आहे. जर या वाढदिवशी बाहेरून काही लोक मला भेटले आणि त्यांच्याशी माझा संपर्क आल्याने पुन्हा कोविड किंवा काही त्रास झाला तर पुन्हा ही शस्त्रक्रिया लांबवावी लागेल. त्यामुळे यंदा कोणीही मला भेटायला येऊ नका. कारण शस्त्रक्रिया किती काळ लांबवायची यालाही मर्यादा आहेत. आपण सारे जिथे आहात तिथेच राहा आणि शुभेच्छा द्या. शस्त्रक्रियेनंतर मी तुम्हा सर्वांना निश्चित भेटेन. पण सध्या मी कुठल्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही, त्यामुळे १४ तारखेला वाढदिवशी मी कोणालाही न भेटण्याचा निर्णय केला आहे. राज ठाकरे यांच्या या घोषणेमुळे मनसे कार्यकर्त्यांची यंदाच्या वर्षी निराशा होणार आहे.
Join Our WhatsApp Community