मुंबई – गोवा महामार्गाच्या समस्येसाठी पदयात्रा काढून शांततेने आपण सरकारला आपली समस्या सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकले नाही तर हात सोडून जा हे आपल्या पक्षाचे धोरण आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला रस्ता कसा असावा याचा आदर्श घालून दिला, त्या महाराष्ट्रात मुंबई-गोवा सारखा रस्ता का, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
सध्या व्यापारी अत्यंत कमी भावात तुमच्या जमिनी घेत आहेत. रस्ता झाला की चांगल्या किंमतीमध्ये या जमिनी विकतील आणि पैसा कमवतील आणि तुम्ही तसेच रहाल. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही आपल्या जमिनी व्यापाऱ्यांना विकू नका. तुम्हाला या सर्व लोकांचा राग कसा येत नाही. पुन्हा त्याच लोकांना तुम्ही कसे निवडून देता. किती लोकांच्या या महामार्गावर जीव गेला? 15 ते 17 वर्षांत अडीच हजार लोक अपघातात गेले, असेही राज ठाकरे म्हणाले.
पैसे किती खायचे याला मर्यादा असते. सिमेंटचे रस्ते असतात हे मला मान्य आहे. मात्र, पेव्हर ब्लॉकचे रस्ते असतात का, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. सरकार कंत्राट काढून केवळ पैसे खात आहे. हे वर्षांनूवर्षे हे सुरू आहे. महाराष्ट्र हा नेहमी पुढारलेला होता, देशाचे प्रबोधन केले आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
मनसेची जागर यात्रा
रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेतर्फे रायगडमध्ये रविवार, २७ ऑगस्ट रोजी जागर यात्रा काढण्यात आली आहे. मनसेचे सर्व प्रमुख नेते या यात्रेत सहभागी झाले आहे. आता लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही ही यात्रा शांततेत काढत आहोत. मात्र, यापुढची यात्रा शांततेत नसणार, असा इशारा मनसे नेते अमित ठाकरे यांनी दिला आहे. तसेच, आमच्यावर काय केसेस करायचे ते करा. जागे व्हा, असेही त्यांनी राज्य सरकारला सुनावले आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात पळस्पे ते मानगाव अशी 16 किलोमीटरची पदयात्रा मनसेतर्फे काढण्यात आली आहे. पळस्पे फाट्यावरून या पदयात्रेला सुरुवात झाली आहे. आठ टप्प्यात मनसे ही पदयात्रा काढत आहे.
Join Our WhatsApp Community