राजस्थानच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना मोठी चूक घडल्याचे समोर आले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शुक्रवारी नजरचुकीने गेल्या वर्षीचे अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली. परंतु, एका मंत्र्याने हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ चूक सुधारली. परंतु, विरोधकांनी सभागृहात एकच गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज ३० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.
‘या’ मंत्र्याने चुक आणून दिली लक्षात
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शुक्रवारी विधानसभेत त्यांच्या चालू कार्यकाळातील अंतिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी बचत आणि दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याचा दावा करत अशोक गेहलोत यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषण सुरू केले. त्यांनी अर्थसंकल्पातील सुरुवातीचे दोन ते तीन उतारे वाचले. तेवढ्यात त्यांच्या मागे बसलेले मंत्री महेश जोशी यांनी मुख्यमंत्र्यांजवळ जाऊन भाषण थांबवायला सांगितले. गेहलोत यांनी अजाणतेपणे मंत्र्याला कारण विचारले. त्यावर, हा जुना अर्थसंकल्प आहे, असे जोशी हळूच म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी लगेचच पान उलटून तारीख पाहिली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. आपली फसगत झाल्याचे समजल्यावर तेही हसले. या सगळ्या घडामोडींमुळे विरोधकांनी अर्थसंकल्प लीक झाल्याचा आरोप करत भाजपच्या आमदारांनी गदारोळ केला. सभापतींनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. वारंवार आवाहन करूनही गोंधळ न थांबल्याने सभागृहाचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आले.
हा लोकशाहीचा अपमान
सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते गुबालचंद कटारिया यांनी अर्थसंकल्प लीक झाला असून तो मांडता येणार नाही, असा आरोप केला. मुख्यमंत्री गेहलोत यांनी मात्र हा आरोप फेटाळला. चुकून एक जास्त पान त्यात जोडले गेले. सभागृहात वितरित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची प्रतच आपण वाचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेहलोत यांनी घोषणाबाजी करणाऱ्या विरोधी सदस्यांना शांततेचे आवाहन करून अर्थसंकल्प मांडू देण्याची विनंती केली. परंतु, विरोधक शांत होत नव्हते. मुख्यमंत्र्यांनी चुकीबद्दल माफी मागावी. अर्थसंकल्पामध्ये चुकून भलतेच पान कुठून आले, असा प्रश्न गुलाबचंद कटारिया यांनी केला. हा लोकशाहीचा अपमान आहे. अर्थसंकल्प वाचण्यासाठी आलेल्या अर्थमंत्र्यांच्या हाती भलताच कागद येणे हे राजस्थानचे दुर्दैव असल्याचा टोला कटारिया यांनी लगावला.
(हेही वाचा – काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटला: कोण रोहित पवार? म्हणतं आमदार प्रणिती शिंदेंनी काढली त्यांची मॅच्युरिटी)
Join Our WhatsApp Community