राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाण्याच्या वाटेवर आहेत. शिंगणे यांनी शुक्रवारपर्यंत अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला नव्हता. मात्र, दादांना पाठिंबा देण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी आज स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला राजेंद्र शिंगणे हे उपस्थित होते. बैठकीत सहभागी होऊन त्यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ते पवार यांच्यासोबत राहतील हे निश्चित झाले होते. मात्र, आज त्यांनी आपली भूमिका काहीशी बदलली.
(हेही वाचा – रात्री उशिरा फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; पुन्हा चर्चेला उधाण)
अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांनी मला दोन-तीन वेळा पाठिंबा देण्याबद्दल विचारले आहे. मी जर त्यांच्याबरोबर राहिलो आणि त्यांना जर सहाकार्य केले तर राज्य सरकारकडून जिल्हा सहकारी बँकेला पूर्णपणे मदत मिळवून देऊ, असे आश्वासन अजित पवार यांनी मला दिले आहे. अशा परिस्थितीत मी अजित पवारांना पाठिंबा देण्याचा विचार करत आहे. अजून पूर्णपणे निर्णय घेतलेला नाही. तरीही अजित पवारांना साथ देऊन जिल्हा सहकारी बँकेचे पूर्णपणे पुनर्वसन करून घेण्याचा माझा प्रयत्न आहे, असे राजेंद्र शिंगणे यांनी आज स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community