राज्यातील कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आरोग्य विभागासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची कोरोना आढावा बैठक झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी महत्वाची बैठक पार पडली. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा आणि उपाययोजनांची माहिती घेतली. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना राज्यातील कडक निर्बंध आणि लॉकडाऊन संदर्भातही शरद पवारंनी चर्चा केली आहे. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील ट्रेन संदर्भात मोठं वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले राजेश टोपे
राज्यातील निर्बंध कडक करताना मुंबईची लाईफलाइन असणारी लोकल पुन्हा बंद होणार का? यासंबंधी चर्चा सुरु झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले, मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाही, अशी माहिती मंत्रालयातील उच्च पदस्थांकडून सांगण्यात आले आहे. तसेच राजेश टोपे यांनी या माहितीला दुजोरा दिला असून मुंबईची लोकल बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासह पुन्हा सध्यातरी राज्यात लॉकडाऊन लावण्याचा विचार नसल्याचे सांगितले.
(हेही वाचा –तुमच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस देताय! तर ‘या’ गोळ्या चुकूनही देऊन नका)
तसेच बैठकीत प्रामुख्याने लसीकरणवर चर्चा झाली. लसीकरण वाढवले पाहिजे असे शरद पवार यांचेही मत आहे. साधारण ८० लाख लोकांनी अजूनही लस घेतली नाही. अनेकांनी फक्त पहिला डोस घेतला आहे तर त्यांचा दुसरा डोस राहिला आहे. या सगळ्यांचे कशा रितीने प्रबोधन करता येईल, याविषयीच्या सूचना शरद पवार यांनी मागवल्या. तसेच १० जानेवारीनंतर कोमॉर्बिड आणि ६० वर्षे वयापुढील व्यक्तींसाठी प्रीकॉशन व्हॅक्सीन उपलब्ध होणार आहे. लग्न सोहळ्यांबाबतच्या गोष्टींवर कडक निर्बंध आणण्याची गरज आहे. कोरोना रुग्णांची संख्या कशी आटोक्यात येईल आणि कशी पुढची परिस्थिती राहिल याबाबतची माहिती दिली आहे. वीकेंड लॉकडाउन किंवा नाईट कर्फ्यूबाबत चर्चा झाली आहे. पण निर्णय झाला नाही. मुख्यमंत्री चर्चा करतील आणि निर्णय घेतील. मुख्यमंत्री लवकरच याबाबत निर्णय घेतील असेही राजेश टोपे म्हणाले आहेत.