राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असताना, आता नाशिकनंतर विरार येथील रुग्णालयात देखील मोठी घटना घडली आहे. विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मात्र राज्यात इतक्या मोठ्या घटना घडत असताना, सरकारमधील मंत्रीच बेताल वक्तव्य करू लागले आहेत. कोरोना काळात संयमाने परिस्थिती हाताळणाऱ्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची देखील जीभ घसरली असून, त्यांनी तर विरारमधील घटना ‘ही काही नॅशनल न्यूज नाही’ असे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय वातावरण तापले असून, आता पुन्हा एकदा विरोधकांच्या रडारवर ठाकरे सरकार आले आहे. आणखी किती बळी हवेत म्हणजे नॅशनल न्यूज होईल, असा संतप्त सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्यातील आघाडी सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांच्या संवेदना मेल्या आहेत. त्यामुळेच हे लोक बेताल बडबड करत आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. आरोग्य व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याऐवजी यांना टीव्हीवर चमकायचे पडले आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.
काय आहे नेमकं टोपेंचे वक्तव्य
आपण रेमडेसिवीर बाबत बोलू शकतो, ऑक्सिजन बाबत बोलू शकतो, पण विरारची घटना ही काही नॅशनल न्यूज नाही. ही राज्यातील घटना आहे. राज्य सरकार त्यावर सर्वोतोपरी मदत करेल, असे धक्कादायक विधान टोपे यांनी केले. त्यानंतर त्यांच्यालर सर्वच स्तरावरुन जोरदार टीका होण्यास सुरुवात झाली.
(हेही वाचाः अजून एक अग्नितांडव! विरार येथील रुग्णालयाला आग… १३ जणांचा मृत्यू)
याआधी या मंत्र्याची जीभ घसरली
राजेश टोपे हे एकमेव मंत्री नाहीत की त्यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. याआधीही काही मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ठाकरे सरकारची कोंडी झाली होती. यामध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, तसेच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील वादग्रस्त विधाने केली आहेत. काय होती ती वादग्रस्त विधाने? पाहूया…
विजय वडेट्टीवार
ठाकरे सरकारमध्ये मदत आणि पुनर्वसन खात्याचे मंत्री असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी साधू हे मनोरुग्ण आहेत व साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत, असे वादग्रस्त विधान केले होते. तसेच महाराष्ट्राला संतांची संस्कृती लाभलेली आहे. महाराष्ट्र संतांच्या शिकवणीवर उभा राहिला. संत व साधू हे वेगवेगळे आहेत. संत हे समाजासाठी समर्पित आहेत. संत हा समाजाचा दिशादर्शक आहे, पण हे साधू लुबाडणारे असतात, असं वडेट्टीवार म्हणाले होते. यावरुन भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी वडेट्टीवार यांच्यावर कडाडून टीका केली होती.
(हेही वाचाः साधू लुबाडणारे असतात, ठाकरे सकारमधील ‘या’ मंत्र्याचे वादग्रस्त विधान!)
जितेंद्र आव्हाड
गेल्यावर्षी मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी वादग्रस्त आवाहन केले होते. अल्लाह को 2011मे ही मालूम था कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में 2019 में कब्रस्तान बना, असे विधान आव्हाड यांनी केले होते. आव्हाड यांनी हे विधान केल्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल देखील झाला होता. कोरोनाचे संकट येणार हे अल्लाहला 2011 सालीच दिसले, म्हणून 2019ला कब्रस्तान बनले, असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान करुन मुस्लिम समाजाला खूश करण्याचे राजकारण आव्हाड यांनी केल्याचे व्हिडिओवरुन दिसत होते.
(हेही वाचाः आव्हाड म्हणाले, अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है इसलिये…)
यशोमती ठाकूर
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर, तसेच मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मतदारसंघात पोहोचलेल्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी वादग्रस्त विधान केले होते. वाशिम जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत त्यांनी पहिल्यांदा वादग्रस्त विधान केले. आत्ताच शपथ घेतलीयं, अजून खिसे गरम व्हायचे आहेत. जे लोक आता विरोधात आहेत, जुन्या सत्ताधाऱ्यांकडे खूप पैसे आहेत. त्यांच्याकडून लक्ष्मीदर्शन होत असल्यास नाही म्हणू नका, असे वादग्रस्त विधान ठाकूर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा विसर पडतो न पडतो तोच त्यांनी आणखी एक वादग्रस्त विधान करत ठाकरे सरकारच्या अडचणीत भर टाकली होती. गायीला आपल्या संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे. गाय पवित्र आहे. गायीला स्पर्श केल्यास तुमच्या मनातील नकारात्मक विचार नष्ट होतील. त्यामुळे गायीला स्पर्श करा, असे अजब विधान त्यांनी केले होते. राज्याच्या महिला व बालविकास मंत्र्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान केल्याने, अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या.
बोलघेवड्या नेत्यांवर मुख्यमंत्री नाराज
सगळ्यात महत्वाचे म्हणजे ठाकरे सरकारमधील या बोलघेवड्या नेत्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांनी तोंडावर ताबा ठेवावा, अशा कडक शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी नेते आणि मंत्र्यांना फटकारले होते. विनाकारण सार्वजनिक वादग्रस्त विधाने टाळा. ज्यामुळे महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार नाहीत अशी वक्तव्य करू नका, अशा कडक सूचना पक्षातील नेत्यांना या बैठकीत करण्यात आल्या होत्या.
Join Our WhatsApp Community