आमदाराच्या पत्नीने आत्महत्येपूर्वी मुलाला केलेल्या मेसेजमध्ये ‘ती’चा उल्लेख

113

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी आत्महत्येपूर्वी मुलाच्या मोबाईल फोनवर मेसेज केला होता. या मेसेजमध्ये एका महिलेचा उल्लेख असून माझे काही बरे वाईट झाल्यास ही महिला जबाबदार असेल असे म्हटले असल्याची चर्चा नेहरू नगर मध्ये सुरू आहे. नेहरू नगर पोलिसांनी या अनुषंगाने तपास सुरू केला असून मुलाचे आणि काही जणांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

( हेही वाचा : दुकानांच्या मराठी पाट्यांवरील कारवाई लटकली कुठे? )

कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पहिल्या पत्नीचे अपघाती निधन झाले आहे. त्यांची दुसरी पत्नी रजनी कुडाळकर हिने रविवारी राहत्या घरातील स्वयंपाक घरात ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. रजनी यांच्यावर सोमवारी चेंबूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगेश कुडाळकर यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत, तर त्यांची दुसरी पत्नी रजनी यांना पहिल्या पतीपासून दोन मुले होती, त्यापैकी एका मुलाचे ऑगस्ट २०२१ मध्ये अपघातात निधन झाले, व दुसरा मुलगा आईसोबत राहण्यास होता. रविवारी सायंकाळी रजनी यांनी राहत्या घरातील स्वयंपाक घरात गळफास लावून जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी रजनी यांनी आपल्या मुलाच्या मोबाईल फोनवर मेसेज केला होता, त्यात एका महिलेचा उल्लेख करण्यात आला असून माझ्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास ही महिला जबाबदार असेल असे मेसेजमध्ये म्हटले असल्याची चर्चा आहे. सदरचा मेसेज मुलाने पोलिसांना दिला असून त्याने आपली फिर्याद नेहरू नगर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. त्याचबरोबर नेहरू नगर पोलीसानी संबधीत काही जणांचे जबाब याप्रकरणात नोंदवले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच संबंधित मेसेजबाबत तपास सुरू असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

२०१२ मध्ये मंगेश कुडाळकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला…

आमदार मंगेश कुडाळकर यांच्यावर २०१२ मध्ये दुःखाचा डोंगर कोसळला होता. कोल्हापूर येथे जात असताना त्यांच्या वाहनाचा सातारा जवळ अपघात झाला होता. अपघातात आई वडील, पत्नी यांचा मृत्यू झाला होता. मंगेश कुडाळकर आणि त्यांची दोन मुले जखमी झाली होती. मंगेश कुडाळकर स्वतः आणि दोन्ही मुले या अपघातात बचावले होते. त्यानंतर काही वर्षांनी मंगेश कुडाळकर यांनी कुर्ला पश्चिम येथे राहणाऱ्या रजनी यांच्यासोबत दुसरा विवाह करून रजनी यांच्या पहिल्या पतीपासून असलेल्या दोन्ही मुलांची जबाबदारी स्वीकारली होती. ऑगस्ट २०२१ मध्ये मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी यांचा मुलगा प्रज्वल याचे चेंबूर सांताक्रूझ लिंक रोड या ठिकाणी मोटारसायकल अपघातात निधन झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.