नोव्हेंबर २०२० मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेली विधान परिषदेतील १२ सदस्यांची यादी अजून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. ती तातडीने मंजूर व्हावी याकरता महा विकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुख मंत्री हे कायम राज्यपालांना विनंती, आर्जव करत आहेत. अशा परिस्थिती ही यादी पुन्हा रखडली जाणार आहे आणि ती काँग्रेसमुळे रखडली जाणार आहे. त्यामुळे आता आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसमुळे महाविकास आघाडीची लागोपाठ दुसऱ्यांदा पंचाईत झाली आहे. काँग्रेसच्या या धरसोड वृत्तीबद्दल राष्ट्रवादीने आधीच नापसंती व्यक्त केली आहे.
‘त्या’ यादीतील रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी!
काँग्रेसने रजनी पाटील यांच्या नावाचा समावेश राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत केला होता. ही यादी राज्यपालांना स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आली आहे. परंतु या यादीवर अद्याप स्वाक्षरी झाली नसल्याने या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. अशा वेळी या यादीतील उमेदवारांना आणखी किती दिवस प्रतीक्षेत ठेवायचे, असा विचार करून काँग्रेसने अखेर या यादीतील रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन टाकली आहे. आता हा निर्णय घेताना काँग्रेसने आघाडीतील इतर घटक पक्षांना विचारात घेतले होते का की पक्षांतर्गत निर्णय म्हणून त्याला पक्षापुरता सीमित ठेवले, याबाबत अजून सुस्पष्टता आलेली नाही. परंतु जर काँग्रेसने हा निर्णय जसा विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा परस्पर घेतला आणि नंतर सांगितला, त्याप्रमाणे घेतला असेल तर मात्र पुन्हा आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.
(हेही वाचा : भाजपा नेत्यांचे ‘ब्लॅकमेल’ करण्याचे काम सुरू- नाना पटोले)
काय परिणाम होईल?
आधीच राज्यपाल नियुक्त यादी १० महिन्यांपासून रखडली आहे. त्यात आता रजनी पाटील यांचे नाव राज्यपालांच्या यादीतून रद्द करावे लागणार आहे. त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. संख्याबळाच्या आधारे पाटील राज्यसभेवर जाणार हे निश्चित आहे. पण त्यानंतर राज्यपाल नियुक्त यादीत रजनी पाटील यांचे नाव रद्द करून त्या जागी दुसरे नाव टाकणे आणि त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घेणे याला आणखी काही कालावधी जाणार आहे. ते कारण घेऊन ही यादी आणखी काही काळ रखडली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community