राज्य मंत्रिमंडळाने राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांच्या यादीत स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे नाव समाविष्ट केले आहे, मात्र आता राष्ट्रवादीने त्यांचे नाव यादीतून वगळण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त पसरले आहे. त्यावर शरद पवार यांनी हे वृत्त फेटाळून लावत शेट्टी यांचे नाव यादीत समाविष्ट करून आम्ही शब्द पळला आहे, निर्णय राज्यपालांनी घ्यायचा आहे, असे म्हटले आहे, परंतु त्यावर समाधान न झालेले राजू शेट्टी यांनी मला ‘त्या’ यादीतून का वगळण्यात आले की नाही, हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. परंतु ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशारा त्यांनी दिला आहे.
(हेही वाचा : देव मंदिरातच नाही, तर रुग्णालयातही! मुख्यमंत्र्यांनी कुणाला सुनावले?)
काय म्हणाले शरद पवार?
राजू शेट्टी नाराज असतील त्याबाबत मला काही म्हणायचे नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जी यादी माननीय राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावतीने दिली आहे. त्यात राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटते की, अशाप्रकारची विधाने कशी केली जातात. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणाने केले आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केले मला त्याच्यावर भाष्य करायचे नाही. मी दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय, असे शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले राजू शेट्टी?
पवारांच्या स्पष्टीकरणावर राजू शेट्टी म्हणाले, आमदार व्हायचे की नाही हा मुद्दा महत्वाचा नाही. पूरग्रस्तांना मदत होणार की नाही यावर शरद पवारांनी बोलावे. पूरग्रस्तांना राज्य सरकारने मदत जाहीर केली. मात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही. आमदारकी द्यावी की देऊ नये, हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की नाही पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचे आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. मला त्या यादीतून का वगळण्यात आले, हे राष्ट्रवादीचे नेते सांगू शकतील. डावलले की नाही हे मलाही माहीत नाही, असे सांगतानाच ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, मी हाडाचा कार्यकर्ता आहे. मला आमदारकी काही मिळो न मिळो माझे आंदोलन सुरूच राहील, असेही राजू शेट्टी म्हणाले.
Join Our WhatsApp Community