एकेकाळी शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात सत्तेत सहभागी झालेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर भाजपाला सोडचिट्ठी दिली आणि महाविकास आघाडीत सहभागी झाले. आता स्वाभिमानचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
महाविकास आघाडी सरकारवर टिका
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शेट्टी महाविकास आघाडी सरकारसोबत गेले. शेट्टींना आमदारकी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा अजूनही प्रलंबितच आहे आणि शेट्टींना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य सरकार करत नाही. या कारणांमुळे शेट्टी महाविकास आघाडीपासूनही दुरावले. आज अखेर शेट्टी यांनी महाविकास आघाडीलाही रामराम ठोकला आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणी बैठक कोल्हापुरात पार पडली. यावेळी शेट्टी यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पूरग्रस्तांच्या निधीबाबत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मोठा विश्वासघात झाला आहे. महाराष्ट्रात यापूर्वी जसे साखर घोटाळे झाले तसे जलविद्युत केंद्रांबाबत होणार आहेत. असा विश्वासघात वारंवार होणार असेल तर या आघाडीसोबत राहायचा का असा प्रश्न आहे. मागे फिरायमचे म्हटले तर 800 शेतकऱ्यांचा बळी घेतला त्यांना पाठिंबा द्यायचा का? शेतकरी विरोधी भूमिका घेतल्या त्यांना मदत करायची का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे. त्याचबरोबर होय आम्ही राजकीय भूमिका बदलल्या पण त्यात शेतकऱ्यांच्या पदरात चार पैसे पडतील हा हेतू होता, असेही शेट्टी म्हणाले. शेट्टींनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली.
Join Our WhatsApp Community