आरोग्य समिती अध्यक्षपदी राजुल पटेल!

सध्या मुंबई कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. अशा वेळी राजुल पटेल यांच्या अनुभवाचा या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी सांघिक प्रयत्नात उपयोग होणार आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्ष पदासाठी पुन्हा एकदा शिवसेनेच्या राजुल पटेल यांची निवड झाली आहे. यापूर्वी त्यांनी ९ ते १० वर्षांपूर्वी आरोग्य समिती अध्यक्षपद भूषवले होते. आरोग्य समिती अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक  रुग्णालयांना भेट देत आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी एक अभ्यासू नगरसेवक म्हणून ख्याती आहे. त्यांच्या या अनुभवाचा फायदा आता पुन्हा महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेला पर्यायाने शिवसेना पक्षाला होणार आहे.

१६ मते मिळवत विजयी झाल्या!

मुंबई महापालिका आरोग्य समितीच्या अध्यक्षपदासाठी सन २०२१-२०२२ करता शुक्रवारी, ९ मार्च रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सेनेच्या राजुल पटेल या १६ मते मिळवत विजयी झाल्या. तर प्रतिस्‍पर्धी भाजपच्या उमेदवार बिंदू चेतन त्रिवेदी यांना ११ मते मिळाली. एकूण ३६ सदस्‍यांपैकी २८ सदस्‍यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. त्‍यातील एक मत बाद झाले. निवडणुकीत तीन सदस्‍य तटस्‍थ राहिले. तर पाच सदस्‍य गैरहजर होते. या निवडणुकीत मुंबईच्या महापौर  किशोरी पेडणेकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळले.

कोविड काळात उपयोग होईल! 

राजुल पटेल यांचा लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम अनुभव आहे. सर्वसामान्यांच्या समस्यांबाबत त्यांना जाणीव आहे. राजुल पटेल यांना प्रशासनातील कामाचाही अनुभव आहे. सध्या सभागृहातील अनुभवी नगरसेवकांमध्ये राजुल पटेल यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सध्या मुंबई कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. अशा वेळी राजुल पटेल यांच्या अनुभवाचा या साथीला नियंत्रणात आणण्यासाठी सांघिक प्रयत्नातही उपयोग होणार आहे.

निवडणुकीत महापौरांचा पक्षपातीपणा!

पीठासीन अधिकारी म्हणून महापौरांनी राजुल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यापूर्वी भाजपच्या उमेदवार बिंदू त्रिवेदी यांनी मतपत्रिका पाहण्यास देण्याची विनंती त्यांच्याकडे केली. सेनेच्या पाच सदस्यांची मते अवैध ठरली, असा त्यांनी आक्षेप नोंदवला. पण महापौरांनी मतपत्रिका भाजप उमेदवाराला पाहण्यास दिली नाही. कोणत्याही उमेदवाराला आपली मतपत्रिका पाहण्याचा अधिकार असतो. पण पिठासीन अधिकाऱ्यांनी तो नाकारला. सेनेच्या राजुल पटेल जर जास्त मतांनी विजयी झाल्या तर मतपत्रिका लपवण्याचे काम महापौरांनी का केला, असा सवाल बिंदू त्रिवेदी यांनी केला. त्यामुळे याचा निषेध म्हणून भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला. पण त्यानंतर झालेल्या उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यामध्ये सेनेचे वसंत नकाशे यांची निवड बिनविरोध पार पडली. दरम्यान हा प्रकार गंभीर असून महापौरांच्या पीठासीन अधिकारी या पक्षपाती वर्तणुकीची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे, असे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी स्पष्ट केले. १६ ऑक्टोबर २०२० च्या एस व टी प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान मते असताना व कोणतेही मत अवैध नसताना महापौरांनी चिठी न काढता परस्पर शिवसेना उमेदवाराला विजयी घोषित केले होते. त्यामुळे याबाबत भाजपने न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here