राज्यसभेचाच फॉर्म्युला राज्यात सत्तापालट होणार? 

101

विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यसभेच्या निवडणुकीतील राजकीय खेळी अखेर सरस ठरली. या निवडणुकीतील सहावी जागा जशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची बनवली होती, तशी ती फडणवीसांसाठीही अस्मितेची बनली होती. भाजपकडे या जागेकरता पुरेशी मतसंख्या नसतानाही भाजपने सहावी जागा जिंकून दाखवली. तब्बल १० अपक्ष आमदार आणि बहुजन विकास आघाडीची तीन मते आपल्याकडे वळवून भाजपने ही किमया साध्य केली. म्हणून आता हाच फॉर्म्युला येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीतही  वापरून भाजप महाविकास आघाडीचा सत्तेचा डोलारा खाली कोसळवणार यात तीळमात्र शंका नाही.

(हेही वाचा मविआच्या एकीला संशयाचा सुरुंग! शिवसेना म्हणते ‘आता तुमचे तुम्ही बघा!’  )

आता विधान परिषदेत भाजपचे सहा उमेदवार?

राज्यसभेच्या निवडणुकीत खुले मतदान होते. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते फुटली नाहीत, परंतु २० जून रोजी विधान परिषदेच्या १० जागांसाठी गुप्त मतदान होणार आहे. त्यावेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसमोर आता स्वतःची मते शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कारण विधानसभेतील भाजपचे संख्याबळ पाहता भाजपचे विधान परिषदेच्या निवडणुकीत ४ उमेदवार सहज निवडून येणार आहेत, परंतु भाजप तरीही ६ सहा उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला मिळालेली मते पाहता त्यांचा विधान परिषदेत पाचवा उमेदवार हा सहज निवडून येईल आणि सहाव्या जागेसाठीही भाजप महाविकास आघाडीला मोठी टक्कर देईल. त्यामुळे महाविकास आघाडीच्या २ जागा धोक्यात येतील, असे  राजकीय विश्लेषक सांगत आहेत.

(हेही वाचा आता विधान परिषदेचा आखाडा! काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराचा ‘संजय पवार’ होणार!)

सरकारच्या स्थैर्यावर प्रश्नचिन्ह! 

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर कालपर्यंत महाविकास आघाडीचे नेते आमची आघाडी मजबूत आहे, असा दावा करत होते, ती आघाडी तितकी मजबूत नाही, हे लक्षात आले आहे. भाजपाला विधान परिषदेत जर सहा जागा जिंकायच्या असतील, तर १५०च्या वर मतसंख्येची गरज असणार आहे.  भाजपने सहाही जागा जिंकल्या, तर तितकी मते सरकारकडे नाहीत, परंतु एकट्या भाजपाकडे आहेत, असा त्यातून अर्थ निघेल आणि हे सरकार अल्पमतात आल्याचे स्पष्ट संकेत मिळताच सरकार अस्थिर करण्याचा भाजपकडून प्रयत्न होईल. तसा प्रयत्न झाला, तर कुंपणावर बसलेल्या आमदारांचीही भूमिका बदलायला वेळ लागणार नाही. त्यामुळे राज्यसभेचा निकाल हा एका जागेचा नाही, तर एकूणच सरकारचा स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा हा निकाल आहे.

तर सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव येईल!

महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आले, तेव्हा त्यांच्याकडे १६९ मतांचे पाठबळ होते, मात्र राज्यसभेच्या निवडणुकीनंतर हे संख्याबळ १६० वर आले आहे. त्यामुळे आता हे संख्याबळ आणखी खाली जाणार नाही हे पाहण्याचे आव्हान महाविकास आघाडीसमोर उभे राहिले आहे. विधानसभेची २०२४ची निवडणूक अडीच वर्षांनी आहे, तितका वेळ थांबून पुढची निवडणूक शिवसेना आणि  दोन्ही काँग्रेसच्या महाविकास आघाडीविरोधात लढून सत्तेत येण्याचे भाजपने ठरवले, तर ते तितके सोपे नाही, म्हणून विधान परिषदेच्या निवडणुकीत राज्यसभेचा फॉर्म्युला वापरून भाजपने जर विधान परिषदेच्या सहाही जागा निवडून आणल्या, तर मात्र अविश्वासाचा ठराव आणून सरकार पाडण्याचा भाजप निर्णय घेईल. कारण एकदा का सत्ता हाती आली तर तिन्ही पक्षातील आमदार फोडून ते आपल्या बाजूने वळवून आपली बाजू मजबूत करणे भाजपासाठी तुलनेने सोपे आहे. सत्तेत नसताना भाजपने ते मध्य प्रदेश आणि कर्नाटकात करून दाखवले ते महाराष्ट्रात सरकार आल्यावर सहज करता येणार आहे, असेही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. सहाव्या जागेसाठी दोन्ही बाजूकडे आवश्यक संख्याबळ नव्हते.

(हेही वाचा Presidential Election 2022: ममता दीदींनी सर्व विरोधकांची बैठक बोलावली, शिवसेनेने मात्र पाठ फिरवली!)

आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपला यश आले. त्यामुळे हा निकाल लागला. हा चमत्कार मला मान्य करावे लागेल, अशी प्रतिक्रिया एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यसभा निवडणुकीच्या निकालामुळे सरकारमधील आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोदी सरकारने ज्या प्रकारे ८ वर्षांत देशात चमत्कार घडवला आहे, तसेच महाराष्ट्रात घडावे, असे राज्यातील जनतेची इच्छा आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.