छत्रपती संभाजीराजे यांच्या खासदारकीसाठीच्या अपक्ष उमेदवारीबाबत निर्णय होत नाही, त्यातच आता ज्या जागेसाठी छत्रपती संभाजीराजे दावा करत होते, त्या जागेसाठी शिवसेना आता छत्रपती संभाजीराजे यांच्याशिवाय दुसरा उमेदवार निश्चित करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी शिवसेनेने दोन नावे निश्चित केली आहेत, त्यापैकी एक नाव ठरवण्यात येणार आहे.
म्हणून शिवसेनेकडून शोध सुरु
शिवसेनेच्या वाट्याला २ जागा आल्या आहेत, त्यातील एका जागेसाठी शिवसेनेकडे ४२ मते आहेत, दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेला राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष त्यांची उरलेली मते देणार आहेत, त्यामुळे शिवसेनेचा दुसरा उमेदवार निवडून येऊ शकतो. छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेच्या दुसऱ्या जागेची अपेक्षा होती, मात्र त्यासाठी शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घातली आहे. परंतु त्यांनी नकार दिल्याने आता शिवसेनेने दुसऱ्या जागेसाठी पक्षातीलच नेत्याचा शोध सुरु केला आहे. त्याकरता शिवसेना माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे नेते अढळराव पाटील यांचे नाव सध्या चर्चेत आहे. मात्र शिवसेनेतील इतर नेत्यांनीही आपली नावे पक्षश्रेष्ठींकडे पोहचवली आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या विश्वासनीय सूत्रांनी दिली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आपल्या उमेदवाराचे नाव लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे. संभाजीराजेंना पक्षप्रवेशासाठी देण्यात आलेली मुदत संपली असून आता ही जागा ग्रामीण भागातील जेष्ठ नेत्याला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community