राज्यसभा निवडणुकीत भाजप धक्का देणार!

सध्या महाराष्ट्रात राज्यसभेच्या ६ जागांच्या निवडणुकीचा मुद्दा गाजत आहे. यात भाजपच्या रिक्त झालेल्या तीन जागा आहेत, तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची प्रत्येकी १ जागा रिक्त झाली आहे. पक्षीय बलाबल पाहता महाविकास आघाडी चौथ्या जागेवरही उमेदवार जिंकून आणू शकते, अशी स्थिती आहे. मात्र भाजप धक्कातंत्राचा वापर करून आपली तिसरी जागा कायम राखण्याची रणनीती आखत असल्याचे सूत्रांची माहिती आहे.
भाजपने आता तिसऱ्या जागेसाठी जोरदार फिल्डिंग केली आहे. त्याकरता राज्यात भाजप राजकीय भूकंप घडवून आणण्याच्या तयारीत आहे. याकरता भाजपच्या गळाला शिवसेनेचा कोकणातील मोठा नेता लागला असल्याची राजकीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे. या नेत्याला भाजप तिसऱ्या जागेवर उमेदवारी देऊन भाजप राज्यसभेच्या निवडणुकीत चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगूण आहे.
काँग्रेसच्या मदतीने शिवसेना ३ उमेदवार देणार
राज्यसभेत काँग्रेसच्या वाट्याला १ जागा असली तरी शिवसेना काँग्रेसच्या वाट्याची जागा घेऊन एकूण तीन जागेवर उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत यांचे नाव पक्के असून दुसरा उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि तिसऱ्या जागेवर छत्रपती संभाजी यांना उमेदवारी देणार असल्याचे सूत्रांकडून समजते. काँग्रेसने राज्यसभेची एक जागा शिवसेनेसाठी सोडावी आणि शिवसेना काँग्रेसला विधान परिषदेत मदत करणार, अशी देवाण-घेवाण झाल्याचे समजते.

कसे आहे पक्षीय बलाबल?

सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदारांचे वजन भाजपकडे आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here