राज्यसभा निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष यांना विश्वासात घेण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात चढाओढ लागली आहे. भेटीगाटी वाढल्या आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आसीम आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर समाजवादी पक्षाची दोन मते शिवसेनेला देणार आहे, असे आझमी म्हणाले.
आझमी यांनी मुख्यमंत्र्याची घेतली भेट
राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरल्याने या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सहावी जागा जिंकण्यासाठी आवश्यक असलेली मते कुठल्याच पक्षाकडे नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना आपल्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी लहान पक्ष, अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीत एक-एक मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी भेट घेतली. वर्षा निवासस्थानी समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार दाखल झाले. यानंतर अबू आझमींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर अबू आझमी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आझमी म्हणाले, आज आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मी त्यांच्यासमोर मागण्यांचा पाढा वाचला. माझ्या मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात सकारात्मक बैठक झाली. त्यामुळे आता समाजवादी पक्षाची दोन्ही मते ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळणार हे स्पष्ट झाले आहे. समाजवादी पक्षाची दोन्ही मते मिळवण्यात मविआला यश आले आहे. आता बहुजन विकास आघाडीची ३ मते आहेत, ती कुणाला मिळणार यावर आता चर्चा सुरु झाली आहे. कारण बविआने जरी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असला तरी राज्यसभा निवडणुकीत बविआने त्यांची मते गृहीत धरू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे बविआच्या ३ मतांवर प्रश्नचिन्ह कायम आहेत.
(हेही वाचा औरंगाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला, राऊतांची माहिती! मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष)
Join Our WhatsApp Community