नाट्यमय घटनाक्रमानंतर राज्यसभेच्या 6 जागांचा निकाल आला. यावर बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला मते न देणा-यांची नावे जाहीर केली आहेत. आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. भाजपने सीबीआय, ईडीनंतर आता केंद्रीय निवडणूक आयोगाचा वापर केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
यांची मते मिळाली नाहीत
या निवडणुकीत सहा सात मते आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची 33 मते मिळाली. हा सुद्धा आमचा विजय आहे. ज्यांनी कोणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मते आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभिमानी पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मते दिली नाहीत, असे संजय राऊत यांनी सांगितले.
आम्ही घोडेबाजार केला नाही
ज्या कारणासाठी सुहास कांदे यांचे मत बाद केले. त्याच कारणासाठी आम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आक्षेप घेतला. मात्र फक्त कांदेचे मत अवैध ठरवले. रवी राणादेखील जे कृत्य होते त्यांचेही मत अवैध व्हायला हवे होते, असही राऊत म्हणाले. इतर मतेही बाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, पण तो डाव आम्ही हाणून पाडला असेही राऊत म्हणाले. आम्ही खबरदारी आधीही घेतली होती, आताही घेऊ, फक्त आम्ही घोडेबाजार केला नाही, असे राऊत म्हणाले.
( हेही वाचा: ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरु; सोमय्यांनी मविआवर साधला निशाणा )
भाजपने पैशांचा पाऊस पाडला
राऊत पुढे म्हणाले की, संजय पवार यांच्या पराभवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पराभवाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपने पैशांचा पाऊस पाडला. संजय पवार उत्तमरित्या लढले. अशा कार्यकर्त्यांची नोंद पक्ष ठेवतो. असे राऊत म्हणाले.
Join Our WhatsApp Community