राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आता मतांची बेगमी करण्याकरता महाविकास आघाडी आणि भाजप यांचे जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यासाठी एका बाजूने अपक्षांना विश्वासात घेताना दुसरीकडे छोट्या पक्षांची मतेही मिळवण्यासाठी दोन्ही बाजूने जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यात एकूण ३ मते असलेल्या बहुजन विकास आघाडीकडे विशेष लक्ष लागले आहे. बविआचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला तरी राज्यसभेच्या निवडणुकीत आमची मते गृहीत धरू नका, असे म्हटले आहे. त्यामुळे अखेर बुधवारी, ८ जून रोजी एनसीपीचे प्रमुख शरद पवार यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. हितेंद्र ठाकूर यांना मानवण्यासाठी अखेर पवारांना मध्यस्थी करावी लागली आहे.
शिवसेना, भाजपकडून मनधरणी
या निवडणुकीत अपक्षांना कोणतेही बंधन नाही मात्र छोट्या-मोठ्या पक्षांना मात्र पक्षाचा व्हीप बंधनकारक असतो. त्यामुळे सध्या बविआच्या ३ मतांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बविआची मते मिळावीत म्हणून भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती, त्यानंतर शिवसेनेचे विनायक राऊत आणि राजन विचारे यांनी ठाकूर यांची भेट घेतली. असे असले तरी शेवटपर्यंत ठाकूर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे अखेरीस यामध्ये आता शरद पवारांची एन्ट्री झाली आहे. शरद पवार यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यामुळे बविआचा भाव आणखी वधारला आहे. आता आमदार हितेंद्र ठाकूर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community