राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने इंडी आघाडीतील घटक पक्षांना चारी मुंड्या चीत करीत सर्वाधिक 30 जागांवर विजय मिळविला आहे. आता संसदेच्या वरिष्ठ सभागृहात भाजपाचे संख्याबळ 97, तर रालोआ 117 वर पोहोचली आहे. (Rajyasabha) सध्या राज्यसभेतील बहुमताचा आकडा 121 इतका आहे. त्यामुळे आता रालोआ (NDA) बहुमतापासून केवळ 4 पावले दूर आहे.
15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणूक
निवडणूक आयोगाने (Election Commission of India) 15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यात उत्तरप्रदेशातील सर्वाधिक 10 जागांचा समावेश होता. या पाठोपाठ महाराष्ट्र आणि बिहारमध्ये प्रत्येकी 6, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 5, कर्नाटक आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 4, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3 आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी निवडणूक झाली.
(हेही वाचा – Eknath Shinde: कार्यवाहीसाठी आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी सही, मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार)
इंडी आघाडीच्या आमदारांचाही मोदीवर विश्वास
इंडी आघाडीतील घटक पक्षांच्या आमदारांचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याची बाब राज्यसभा निवडणुकीच्या निकालातून दिसून आली आहे. यामुळे या आमदारांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना मते देण्याऐवजी नरेंद्र मोदी यांनी आशिर्वाद दिलेल्या उमेदवारांना आपली मते दिली आहेत.
सपा आणि काँग्रेसच्या आमदारांचा पक्षांवर अविश्वास
राज्यसभेच्या निवडणुकीत हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांत क्रॉस व्होटिंग झाले. यामुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला प्रत्येकी एक जागा अतिरिक्त मिळाली आहे. उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि सपाच्या आमदारांनी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग केले. याचा फायदा भाजपाला झाला. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, काँग्रेस आणि सपाच्या आमदारांनी क्रॉस व्होटींग लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी केली आहे. यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचे चित्र नेमके कसे असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
56 पैकी 30 जागांवर भाजपाचा विजय
राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यातील सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टीने जिंकल्या आहेत. भाजपाला सर्वाधिक 30 जागांवर विजय मिळाला आहे. यातील 20 खासदार बिनविरोध निवडून आले आहेत. याशिवाय, उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात एक-एक खासदार अधिकचा निवडून आला आहे. हिमाचल प्रदेशात तर काँग्रेसने भाजपाच्या उमेदवाराला हरविण्यासाठी सर्व डावपेच आखले होते. मोदी यांच्या दूरदृष्टीवर विश्वास असलेल्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपाचे हर्ष महाजन यांना मतदान केले. अशा पध्दतीने भाजपाचे एकूण 30 खासदार निवडून आले आहेत.
(हेही वाचा – Railroad Project: नागपूर-नागभीड रेल्वेमार्गाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मान्यता, वन्य प्राण्यांच्या भ्रमणासाठी ७ भुयारी मार्ग)
भाजपा राज्यसभेत मोठा भाऊ
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर भाजपा आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची ज्येष्ठ सभागृहातील संख्या बहुमताजवळ पोहचली आहे. भाजपाची सदस्यसंख्या 97 झाली आहे. तर, राज्यसभेतील रालोआ खासदारांची संख्या 117 वर पोहचली आहे. सध्या राज्यसभेची सदस्यसंख्या 240 आहे. अशात 121 हा बहुमताचा आकडा रहाणार आहे. अर्थात बहुमताच्या आकड्यापासून रालोआ आता फक्त चारने मागे आहे. एकट्या भाजपची संख्या 97 एवढी झाली आहे. यात 5 नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे. तर काँग्रेस 29 खासदारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
56 जागांच्या निवडणुकीचा निकाल
या निवडणुकीत भाजपाने (BJP) 30, काँग्रेस (Congress) 9, तृणमूल काँग्रेस 4, वायएसआर काँग्रेस 3, राजद 2, बीजेडी 2, सपा 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, शिवसेना 1, भारत राष्ट्र समिती 1 आणि जेडीयू 1 जागा जिंकली आहे. यातील 41 खासदार बिनविरोध निवडून आले आहेत.
मंगळवारच्या मतदानानंतर भाजपा 97 सदस्यांसह राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष झाला आहे. यानंतर राज्यसभेत काँग्रेसचे 29, तृणमूल काँग्रेसचे 13, डीएमके आणि आपचे प्रत्येकी 10, बीजेडी आणि वायएसआरसीपीचे प्रत्येकी 9, बीआरएसचे 7, आरजेडीचे 6, सीपीएमचे 5 आणि एआयएडीएमके आणि जेडीयूचे प्रत्येकी 4 सदस्य होतील.
काय होते यापूर्वीचे पक्षीय संख्याबळ ?
सध्या राज्यसभेचे एकूण संख्याबळ 240 आहे. या 56 जागांच्या निवडणुकीपूर्वी भाजपा 93 सदस्यांसह सर्वात मोठा पक्ष होता, तर काँग्रेस 30 सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकावर होता. आता भाजपाने 30 जागा जिंकल्यामुळे भाजपाचे संख्याबळ 97 झाले आहे, तर काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊन 29 वर आले आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर रालोआची संख्या 117 वर पोहचल्यामुळे कोणतेही विधेयक पारित करण्यास सरकारला फारशी अडचण जाणार नाही. यापूर्वी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष इंडी आघाडीचा घटक होता. शिवाय, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष आणि वायएसआर काँग्रेस यांची तटस्थ भूमिका होती. परंतु, आता जेडीयू रालोआत सामील झाली आहे. सोबतच ओरिसाचे मुख्यमंत्री बीजेडी, टीडीपी आणि वायएसआर कॉग्रेस भाजपासोबत आले आहेत. यामुळे सरकारला आता राज्यसभेत कोणतेही विधेयक पारित करायचे असेल, तर फारशी कसरत करावी लागणार नाही.
किती असते राज्यसभेची सदस्यसंख्या ?
राज्यसभेच्या सध्याच्या संख्याबळानुसार 240 ही सदस्यसंख्या आहे. भारतीय संविधानानुसार राज्यसभेची सदस्यसंख्या 238 आणि 12 राष्ट्रपती नियुक्त खासदार अशी एकूण 250 आहे. मात्र, सध्याची सदस्यसंख्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून 233 आणि राष्ट्रपती नियुक्त 12 सदस्य अशी एकूण 245 आहे. त्यापैकी जम्मू काश्मीरच्या चार जागा रिक्त आहेत. राष्ट्रपती नियुक्त खासदाराची एक जागा देखील रिक्त आहे. त्यामुळे 240 ही सदस्यसंख्या निश्चित केल्यास 121 हा बहुमताचा आकडा होतो. सध्या रालोआची राज्यसभेची सदस्यसंख्या 117 झाली आहे. (Rajyasabha)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community